नाशिक: सगळ्यांनी ठरवलं आहे की भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेले चोर आणि लफंगे आहेत त्यांना मोडून काढायचं, त्यामुळे देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात संघर्ष करावा, एकत्र येऊन लढल्याशिवाय ही झुंडशाही संपणार नाही, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले. संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर होते. ते एका खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, "एकत्र येऊन लढल्याशिवाय ही झुंडशाही संपणार नाही. निवडणुका कधीही आल्या तरी, आम्ही तयार आहोत. त्यांच्या वकिलांनी तशी कमिटमेंट देखील केली होती. याचा अर्थ ते कोर्टाला जुमानत नाही, त्यांना वाटतंय आम्ही कोर्टदेखील खिशात घेऊन फिरू. परवा गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही पक्ष का सोडला ते..? त्यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं होतं, हे स्पष्ट आहे."


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, हा लोकशाहीवरील जबरदस्त हल्ला आहे. ते उपमुख्यमंत्री आहे. अनेक खाते देखील त्यांच्याकडे आहे. त्यांनी शाळांना जो दर्जा प्राप्त करून दिला, त्याची जगात वाहवा होते. हा अशा प्रकारे एका व्यक्तीचा निर्णय नसतो.


केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. छगन भुजबळ यांच्या बाबतीत देखील असंच घडलं. महाराष्ट्र सदन हा एकटा त्यांचा निर्णय नव्हता, तो कॅबिनेटचा निर्णय होता. मिंधे गटाचे हिशोब कुणी बघायचे. ते आश्रमात राहतात, की हिमालयात राहतात? 50-50 खोके त्यांनी खाल्ले. त्यांचा हिशोब कुणी मागायचा? देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात संघर्ष करावा. एकत्र येऊन लढल्याशिवाय ही झुंडशाही संपणार नाही, असे आवाहन यावेळी राऊत यांनी केले. 


कसबा चिंचवड निवडणुकीत पैसे वाटप केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षावर करण्यात येत आहे. या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले की, हा अत्यंत गंभीर आरोप आहे. या महाराष्ट्रात फक्त पैशाचेच राज्य सुरू आहे. पुण्यातील जनता त्यांना धडा शिकवेल. त्यांच्या गद्दारीची दखल जगातील 33 देशांनी घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवल्यावरून राऊत म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला मान-सन्मान दिला, ज्यांचे तुम्ही मीठ खाल्ले, त्यांचा फोटो तुम्ही काढता, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. इतके दळभदरी लोकं आमचे सहकारी होते, याची लाज वाटते, अशी तोफ डागली असं संजय राऊत म्हणाले.


भाजपने किती पंडित मारले गेले, याचा हिशोब द्यावा....


दोन दिवसांपूर्वी काश्मीर पंडितावर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेसंदर्भात राऊत म्हणाले की, मी तिथे जाऊन आलो. या देशाचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री तिथे जात नाही. मी भारत जोडो यात्रेत जाऊन आलो. ते लोकं म्हणतात आम्हाला सुरक्षा द्या. तिथे टार्गेट किलिंग होत आहे. मात्र भाजपने याच मुद्द्यावर मते मागितली. भाजपने किती पंडित मारले गेले, याचा हिशोब द्यावा, असा घणाघात यावेळी राऊत यांनी केला. 


मराठी अभिजात भाषा दर्जा संदर्भात राऊत म्हणाले की, केंद्र सरकारने स्वाभिमानी मराठी सरकार पाडून त्यांचे मराठीवर किती प्रेम आहे, हे दाखवून दिले. या सरकारने त्यांच्या महाशक्तीला सांगावे की अभिजात भाषेचा दर्जा द्या. त्यांचे सरकार असूनही होत नसल्याचे राऊत म्हणाले. 


नाशिकमध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभा...


उद्धव ठाकरे यांची 26 मार्च रोजी मालेगाव येथे उत्तर महाराष्ट्रातील भव्य सभा होणार असून त्यानंतर नाशिकला गोल्फ क्लब येथे नंतरच्या काळात सभा होईल. मार्चमध्ये मालेगाव येथे सभा घेण्याचे अद्वय हिरे यांचा प्रवेश हे एक निमित्त असल्याचे ते म्हणाले. काल आदित्य ठाकरे यांची वरळीत प्रचंड सभा झाली. चिन्ह नाही, सुनावणी सुरू आहे, तरीदेखील सामान्य जनता ठाकरे यांच्या बाजूने आहे. येत्या महिनाभरात नाशिकमध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार असून याद्वारे विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 26 मार्च रोजी मालेगावात विराट सभा होणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले.