Pragya Singh Thakur : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्या उपस्थितीत मालेगावात (Malegaon News) विराट हिंदू संत संमेलन (Hindu Sant Sammelan) पार पडणार होते. मात्र, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजते.
मालेगावात हिंदू संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना 'हिंदू वीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती, ह. भ. प. संग्राम बापू भंडारे, हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे, जैन धर्मगुरु निलेशचंद्र महाराज हे देखील उपस्थित राहणार होते. सुरवातीला कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस व महसूल प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. आयोजकांनी त्यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर न्यायालयाने कार्यक्रमाला परवानगी दिली होती.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दौरा रद्द
मालेगावातील संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित राहणार होत्या. रमजानचा महिना सुरू असल्यानं मुस्लिम संघटनांकडून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. आज मालेगावात होणाऱ्या संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह यांना हिंदूवीर पुरस्कार दिला जाणार होता. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यक्रम संपवण्याच्या तसेच साध्वींनी प्रक्षोभक भाषण न करण्याच्या अटीवर न्यायालयाने कार्यक्रमाला परवानगी दिली होती. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यक्रमाची वेळ असताना अद्यापही कार्यक्रमाला सुरुवात नाही. साध्वी प्रज्ञासिंह अद्याप मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात पोहचल्या नसल्याची माहिती मिळत आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचा मालेगाव दौरा सुरुवातीपासूनच वादात सापडल्यानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दौरा रद्द केल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे आयोजकांना मात्र साध्वी प्रज्ञासिंह कार्यक्रमाला येण्याची अपेक्षा आहे. तर मिलिंद एकबोटे देखील संत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी
2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सात जण आरोपी आहेत, ज्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात त्यांना काही प्रमाणात सुट दिली गेली असून, सध्या त्यांच्यावर सुनावणी सुरू आहे. त्यांच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
आणखी वाचा