नाशिक : मुंबईतील पवईमध्ये (Mumbai) आज खळबळजनक घटना घडली असून रोहित आर्यनामक व्यक्तीने 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवले होते. या घटनेत पोलिसांनी मुलांची सुटका केली असून आरोपी रोहित आर्यचा (Rohit ary) एन्काऊंटर करण्यात आला आहे. मात्र, राज्याच्या शालेय शिक्षण विभागावर गंभीर आरोप करत रोहितने हे कृत्य केल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. कारण, शिक्षण विभागाकडून आपली फसवणूक झाली असून सरकारने 2 कोटी रुपये थकवल्याचा आरोपही रोहितने केला होता. त्यावर, माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आता, विद्यमान शिक्षणमंत्री दादा भुसे (dada bhuse) यांनीही आपली भूमिका मांडली. तसेच, उद्यापर्यंत या घटनेचा संपूर्ण अहवाल येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

रोहित आर्या यांच्या संदर्भात सविस्तर अहवाल विभागाकडून मागविण्यात आला आहे. उद्यापर्यंत सविस्तर माहिती देण्यात येईल. प्राथमिक तपासानुसार, अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क संस्थेमार्फत “स्वच्छता मॉनिटर” हा उपक्रम राबविण्याबाबत 14 सप्टेंबर 2022 रोजी शासनाला पहिले निवेदन प्राप्त झाले होते. शासनाच्या प्रकल्पांसाठी मान्यता, खर्च, कार्यपद्धती, निविदा आणि अटी-शर्ती आवश्यक असतात. पण, या प्रकरणात अशी कोणतीही कार्यपद्धती राबविल्याचे दिसत नाही. अप्सरा मिडीया एंटरटेनमेंट नेटवर्कने शाळांकडून रक्कम जमा केल्याचे आढळून आले आहे. जे शासनाच्या नियमांनुसार मान्य नाही. सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रोहित आर्य प्रकरणी राज्य शासनाचं स्पष्टीकरण

१) अफसरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स यांना शालेय शिक्षण विभाग किंवा शासनामार्फत कोणतीही मान्यता प्राप्त झालेली नाही.

Continues below advertisement

२) अफसरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स यांच्याकडून स्वच्छता मॉनिटर या उपक्रमांतर्गत काही शाळांना पैसे देण्यात आले किंवा शासन निधीचा वापर करण्यात आला, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

३) या घटनेचा कोणत्याही प्रकारे शासन किंवा शालेय शिक्षण विभागाशी संबंध नाही.

४) अफसरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ हा उपक्रम शासनाने संमती न देता केवळ सामाजिक संस्थेच्या स्वरूपात राबविण्यात आला होता. त्यामुळे सदर प्रकरणी रोहित आर्या यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाशी संबंधित किंवा त्यांच्या कार्यांशी निगडित नाही. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव विपुल महाजन यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. 

दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण

"मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा पर्सनली रोहित आर्य यांना मदत केली होती. मी चेकने त्यांना स्वत: पैसे दिले आहेत. पण, सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे की, 2 कोटी मला येणं आहे हा मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत", असं दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच,  रोहित आर्य हे स्वच्छा मॉनिटर नावाची एक स्किम चालवत होते. ते शासनाच्या मोहीमेत सहभागी झाले होते. त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं. पण, रोहित आर्य यांचं म्हणणं होतं की, आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही. याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता. अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटलं.

पोलिसांकडून रोहित आर्यचा एन्काऊंटर

शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनं मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.

हेही वाचा