Nashik News : नाशिक महापालिकेतील रस्ते झाडण्यासाठी पालिकेनं यांत्रिक झाडू (स्वीपिंग मशीन) खरेदी करण्याचा भाजपनं घेतलेला निर्णय विद्यमान आयुक्तांनी काही काळासाठी बाजूला ठेवला होता. मात्र आता आयुक्तांनी याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष स्वीपिंग मशीनचे काम पाहण्यासाठी दोन अधिकारी गुजरातमधील भावनगर येथे गेले आहेत.
नाशिक महापालिका पहिल्या पंचवार्षिकपासून यांत्रिक झाडू खरेदी करणार अशा चर्चा होत्या. मात्र कामगार संघटनेच्या विरोधामुळे अनेकदा हा प्रस्ताव बारगळला होता. गेल्या वर्षी भाजपची सत्ता असताना अशा प्रकारचा यांत्रिक झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अडीच कोटी रुपयांचा हा यांत्रिक झाडू आणि दुरुस्ती खर्च मिळून सुमारे दहा कोटी खर्च जात असल्याने त्यावेळी यावरून वाद निर्माण झाला.
सफाई कामगारांच्या भरतीसाठी शासन परवानगी देत नसल्याचा दावा तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला होता. मात्र त्यानंतर महापालिकेतील लोकप्रतिनिधींची कारकीर्द संपुष्टात आली. त्यानंतर आयुक्त रमेश पवार यांनी महापालिकेवर होणारा एकूणच आर्थिक भार लक्षात घेऊन काही प्रकल्प बाजूला ठेवले. त्यात यांत्रिक झाडू चा देखील समावेश होता. शहराला अशा प्रकारच्या झाडांची गरज आहे का हे तपासून निर्णय घेऊ असे त्यांचे म्हणणे होते.
दरम्यान आता आयुक्त यांत्रिक झाडूसाठी राजी झाले असून त्यानुसार झाडूची कार्यक्षमता तपासणीसाठी अधिकारी भावनगरला पोहोचले आहेत. नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड आणि यांत्रिकी विभागाचे कार्यकारी बाजीराव माळी हे अहमदाबाद येथे सोमवारी रवाना झाले आहेत.
गुजरातला प्रत्यक्ष पाहणी
नाशिक महापालिकेने झाडूची चाचणी करण्यासाठी नाशिकमध्ये हे मशीन आणण्यास ठेकेदार कंपनीला सांगितले होते, मात्र गुजरातमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीत असलेले मशीन काढून येणे शक्य नसल्याने प्रत्यक्ष पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना गुजरातमध्ये आमंत्रित केले. अहमदाबाद महापालिकेत 40 वेल्डिंग मशीन असून भावनगर महापालिकेकडे 16 मशीन आहेत.
कॉलेज रोडवर चाचणी
सध्या नाशिकमध्ये यांत्रिक झाडू उपलब्ध नसला तरी अधिकारी वर्ग गुजरातला पाहण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर किती मशीनची आवश्यकता हे सांगितले जाईल. त्यानंतर शहरातील महत्वाच्या मार्गावर मशीनची चाचणी घेण्यात येईल. यात प्रामुख्याने कॉलेज रोड सारख्या ठिकाणी चाचणी घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.