Nashik News: नाशिक जिल्हा बँकेविरोधात (NASHIK DISTRICT CENTRAL CO-OP BANK) बिऱ्हाड मोर्चा काढण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabimani Shetkari Sanghatna) ठाम आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. मात्र, यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. याबाबत काल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासोबत दोन तास बैठक झाली. मात्र या बैठकीतही तोडगा निघाला नसल्यानं स्वाभिमानी मोर्चावर ठाम आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टीही (Raju Shetti) आजच्या या मोर्चात सहभागी होणार आहेत.
आमच्या मागण्या पालकमंत्र्यांच्या लेव्हलवर नाही, त्यामुळे आंदोलन सुरूच राहील, मोर्चा होईल, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. तर येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांची आणि सहकार मंत्र्याशी बैठक घडवून आणून प्रश्न सोडवला जाईल, असं आश्वासन दादा भुसे यांनी दिले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची जमीन वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज दराने सरळ व्याज आकारणी करावी ही मागणी शेतकऱ्यांची आहे. असे झाल्यास सगळे शेतकरी कर्ज भरायला तयार आहेत, असे स्पष्ट मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
तसेच आमची ही मागणी अवास्तव नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ही सक्तीची वसुली आणि लिलाव प्रक्रिया थांबवावी अशी मागणी आहे. बँक बुडावी अशी कोणत्याही शेतकऱ्याची इच्छा नाही. मात्र मूळ कर्जाच्या चार पट रक्कम भरावे लागते, हे अन्यायकारक आहे. मात्र धन दांडग्या शेतकऱ्यांवर आर्थिक गैर व्यवहाराचे गुन्हे दाखल करा, काहीही कारवाई करा, आम्हाला देणे घेणे नाही, अशा स्पष्ट शब्दांत राजू शेट्टी बँक व्यवस्थापनास सुनावले आहे.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, लिलावातील मालमत्ता कवडीमोल भावात विकली जाते, हे अन्यानकारक असून जिल्हा बँक वाचवण्यासाठी सरकारने विशेष धोरण राबवावे. तसेच आज आम्ही मोर्चा काढणारच कारण आमच्या मागण्या पालकमंत्र्यांच्या लेव्हल वर नाही. आमचे आंदोलन सुरूच राहील, मोर्चा होईल. सकाळी दिंडोरी तालुक्यातील वणी पासून मालेगाव पर्यंत हे मोर्चा आंदोलन होईल. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. त्याचबरोबर या आंदोलनात हजारो शेतकरी यात सहभागी होतील. दादा भुसे यांच्या घरावर आंदोलन नेत आहोत, कारण पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी आमची अपेक्षा असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
दादा भुसे म्हणाले...
थकीत कर्जामुळे नाशिक जिल्हा बँक अडचणीत आलेली आहे. बँकेचे लायसन्स रद्द होण्याची वेळ आली आहे. ही वसुली ताबडतोब थांबवावी अशी राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या दोन्ही मागण्या या सहकार मंत्री महोदय आणि शासन पातळीवरील आहेत. शेट्टी राजू आणि त्यांचे प्रतिनिधी यांची येत्या चार दिवसांत सहकार मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊ, असे आश्वासन भुसे यांनी राजू शेट्टी यांना दिले आहे. तसेच तशी वेळ आल्यास मुख्यमंत्री महोदय यांच्याशी देखील चर्चा होईल, असेही भुसे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :