Raj Thackeray and Uddhav Thackeray : महायुती सरकारने राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवताना हिंदी भाषा सक्तीची केली होती. यावरून राज्यात चांगलाच राजकीय गदारोळ झाला. या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यभर आंदोलन छेडले. राज ठाकरेंनी सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिल्यानंतर या आंदोलनात सर्वप्रथम उडी घेणारा पक्ष ठरला तो उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट. यानंतर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसून आले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. 

नाशिकमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात असून, यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन नागरी प्रश्नांवर सत्ताधारी महायुती सरकारला जाब विचारण्याची दिशा ठरविणार आहेत.

वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होणार चर्चा

सुरुवातीला मराठी भाषा आणि स्थानिकांच्या हक्काच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षांनी आता नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर संयुक्त कृती करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

ठाकरे गटाच्या कार्यालयात बैठक

या बैठकीत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील स्थानिक कार्यालयात पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये अनेक वर्षांनंतर पुन्हा मनोमिलनाचे चित्र दिसू लागले असून, कार्यकर्त्यांमध्येही या घडामोडींमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्रित येत आहेत. त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची मानली जात आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ठाकरे बंधुंचा 'बेस्ट' निर्णय, मुंबईतील निवडणुकीसाठी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह