मालेगाव: डाळिंबाची (Pomegranate Price)  आवक घटल्याने नाशिकच्या मालेगावमध्ये डाळींबाच्या भावात जाळीमागे ( क्रेट ) 500  ते 600  रुपयांची वाढ झाल्याने चांगल्या प्रतीच्या डाळींबाला प्रति जाळी ( क्रेट ) 2500 ते 2600 रुपये भाव मिळत आहे.मात्र असे असले तरी बदलते हवामान व उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन मिळत नसल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.


नाशिकच्या कळवण,देवळा, सटाणा व मालेगाव हा परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. मात्र बदलते हवामान व अत्यल्प पावसामुळे डाळिंबावर तेल्या व मर रोगाचा प्रार्दुभाव वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. उत्पादनात घट मात्र मागणी वाढल्याने डाळिंबाची लाली आणखीच खुलली आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलोला 120 ते 130 रुपयांचा भाव मिळत आहे.मात्र डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना चढ्या भावाचा काहीच फायदा होतांना दिसत नाही. डाळींब उत्पादकांनी पाणी विकत घेऊन डाळींब बागा जगवल्या. बदलत्या हवामानामुळे महागड्या औषध फवारणी करावी लागली मात्र तेल्या व मर रोगाने डाळिंब उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन मिळत नसल्याने भाव वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांत मात्र निराशा आहे.


 वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवालदिल


दरम्यान, मागील सप्ताहात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला 1700 ते 2000 रुपये प्रति जाळी इतका दर मिळत होता.मात्र डाळिंबाची आवक घटल्याने हाच दर आता 2200 ते 2600 रुपयांपर्यंत जावून पोहचला आहे. एकंदरीत डाळिंबाची आवक घटत राहिली डाळिंबाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच, डाळिंबाला सध्या मिळत असलेल्या वाढीव दरामुळे ग्राहकाला जरी डाळिंब महाग वाटत असले तरी शेतकऱ्यांना मात्र डाळिंब उत्पादनाचा खर्च वाढीव असल्याने भाव वाढूनही फायदा होतांना दिसत नाही. 


 डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र  (Maharashtra) आघाडीवर


आरोग्याच्या दृष्टीनं डाळिंब (Pomegranate) हे पिक खूप महत्वाचे आहे. डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंबात अनेक पोषक घटक आढळतात. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, लोह, पोटॅशियम आणि झिंक आढळतात. या कारणांमुळे वर्षभर बाजारात डाळिंबाची मागणी कायम राहते. भारतात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील शेतकरी दरवर्षी डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा 54.85 टक्के आहे. 


हे ही वाचा :


राज्यात दुधाचा दर निश्चित! ठरवून दिलेला दर न दिल्यास, अन् भेसळ आढळल्यास थेट गुन्हा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती