PM Narendra Modi नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार, असे त्यांनी म्हटले. नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि भारती पवार (Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय शिवाजीच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्रीराम चंद्राला नमन करतो, असे त्यांनी म्हटले. काल काशीत बाबा विश्वनाथ आणि काल भैरवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. आज त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या धर्तीवर आलोय. तुमची सेवा हेच माझ्या आयुष्यातील ध्येय आहे. 


पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना टोला 


तुम्ही मागील 10 वर्षात माझे काम पाहिले आहे. मी आज तुमच्याकडे तिसऱ्या टर्मसाठी आशीर्वाद मागण्यास आलोय. काँग्रेसचे इतके हाल आहेत की, त्यांचे महाराष्ट्रातील एक नेते म्हणताय मतदान संपल्यावर काँग्रेसमध्ये विलीन होऊन जावे. आपले दुकान बंद करावे. त्यांना वाटते की, सगळे एकत्र आले की विरोधक बनतील, असे त्यांचे हाल आहेत, असा टोला पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना लगावला.    


नकली शिवसेना विलिन झाली की बाळासाहेबांची आठवण येईल 


नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणारच आहे.  हे जेव्हा होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. बाळासाहेब म्हणायचे की, मला काँग्रेससोबत जाण्याचे वेळ आली की, मी माझे दुकान बंद करेल. मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही. बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर उभारले जावे. जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवायचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचे होते. मात्र याचे सर्वात मोठे दुःख नकली शिवसेनेला होत आहे. 


नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले


स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिवसरात्र काँग्रेस शिवी घालत असताना देखील नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहे. राज्यातील जनता या लोकांना शिक्षा देणार आहे. धर्माच्या आधारावर बजेटचे देखील विभाजन करण्याचे काम काँग्रेसने केले आहे, अशी टीका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 


60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही खरेदी केला - पंतप्रधान मोदी


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना एक शेतकरी उठला व कांद्यावर बोला म्हणून घोषणाबाजी करू लागला. नंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला लगेच ताब्यात घेतले. यानंतर पंतप्रधानांनी कांद्याच्या प्रश्नावर भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कांदा स्टॉक करण्याचे काम आम्ही सुरू केले. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही खरेदी केला. आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढला आहे. निर्यातीसाठी आम्ही अनुदान देखील दिले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Mumbai Metro : मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो, जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद, अचानक निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होणार


Yogi Adityanath Road Show In Mumbai: नरेंद्र मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो; उज्वल निकम यांच्यासाठी उतरणार मैदानात