Nashik: नाशिकमध्ये 2027मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असली तरी प्रस्तावित साधू ग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची कत्तल होणार असल्याचं कळल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली आहे. साधू महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून त्यासाठी मोठे वृक्षतोड करावी लागणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या विकास कामांपैकी एक म्हणजे एसटीपी (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) अर्थात सांडपाणी प्रकल्पासाठी 300 झाडांची कत्तल झाल्याचं कळतंय. साधू ग्रामचा 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरीत असताना एसटीपी प्लांटसाठी झाडांची कत्तल केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. त्यामुळे आता साधूग्रामच्या जागेसह तपोवन परिसरातच उभारला जाणारा हा नवीन एसटीपी प्लांटही वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
झाडांच्या कत्तलीला सुरुवात
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही झाडे तोडली जाणार होती. विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले होते. झाडांच्या कत्तलीला सुरुवात झाली आहे. झाडांवर चढून पर्यावरण प्रेमी या कत्तलींना विरोध करताना दिसत आहेत. तपोवन आतील 300 झाड तोडली गेली आहेत. कुंभमेळ्यापूर्वी सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी उभारल्या जाणाऱ्या प्लांटसाठी ही कत्तल करण्यात आल्याचे समजते. अन्य काही ठिकाणीही एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत. तपवन भागातील जवळपास 300 झाड तोडली गेली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन - चार महिन्यांपासून तयारी सुरू आहे. राज्य सरकारने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये 1482.95 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर केला होता. सिंहस्थ कुंभमेळाला येणाऱ्या भाविकांचा ताफा आणि होणारी गर्दी लक्षात घेता मूलभूत नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प गरजेचा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या एकट्या प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी पालिकेवर केलाय. 447 झाडांना तोडण्याचे नोटीस देऊन परवानगी घेतली असून त्यातील 300 झाड तोडली आणि उर्वरित वाचवले असल्याचा पालिका प्रशासनाने दावा केला आहे. तपोवन परिसरात उभारला जाणारा हा नवीन एसटीपी प्लांट वादात सापडला आहे. साधूग्रामच्या 1800 झाडांच्या कत्तलीचा प्रश्न अजून सुटलेला नसताना एसटीपी प्लांटसाठी झाडाच्या कत्तलीमुळे हा वाद आणखी तापण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचा सरकारचा युक्तिवाद काय?
साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोध केला आहे. एकीकडे नाशिकच्या तपोवनात वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमींचे आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15 हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्वतः राजमुद्री येथे जाऊन 15 फूट उंचीची सुमारे 15 हजार देशी झाडे लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड केली आहे. ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाच्या माध्यमातून झाडाची देखभाल केली जाणार आहे.