Nashik Tree Cutting Sayaji Shinde: नाशिकमध्ये (Nashik) 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Kumbh Mela 2027) मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर सिने अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी तपोवनात जाऊन वृक्षाची पाहणी करत एकही वृक्ष तोडू देणार नाही, असा इशारा दिला. मात्र, यावेळी त्यांनी साधू आले गेले काही फरक पडत नाही, असं वक्तव्य केल्याने साधू महंतांमध्ये नाराजी पसरली असून काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुंभमेळा काय आहे हे सयाजी शिंदे यांना माहिती नाही, त्यांची दिशाभूल केली जात असून शिंदे यांनी साधूंवर व्यक्तिगत टीका करू नये, असे आवाहन महंत सुधीरदास पूजारी यांनी केले आहे.
Sudhirdas Pujari on Sayaji Shinde: नेमकं काय म्हणाले सुधीरदास पुजारी?
महंत सुधीरदास पुजारी म्हणाले की, सयाजी शिंदे आज तपोवन वृक्षतोडीसंदर्भात नाशिकमध्ये आले होते. वास्तविक पाहता कुंभमेळा काय आहे? याची त्यांना माहिती देखील नाही. कुंभमेळ्यासंदर्भात त्यांच्या शेजारी असलेल्या एका विद्वान गृहस्थाला ते विचारतात, तो विद्वान गृहस्थ यापूर्वी सांगतो की, कुंभमेळा हा अकबराने भरवलेला आहे. अशा लोकांच्या सल्ल्याने जर सयाजी शिंदे येऊन पाचशे वडाची झाडे तोडत आहेत, चारशे वडाची झाडे तोडत आहेत, असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत असतील तर त्यांनी संपूर्ण माहिती घ्यावी. त्यानंतर आंदोलनाच्या संदर्भात त्यांची मतं व्यक्त करावीत. व्यक्तिगत संत, महात्मे, कुंभमेळा यावर टीका करू नये, असे त्यांनी म्हटले.
Sayaji Shinde: नेमकं काय म्हणाले सयाजी शिंदे?
सयाजी शिंदे म्हणाले की, झाडं ही आमची आईबाप आहेत. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजूत घेतली पाहिजे. तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत. त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन, लढा उभा राहिलाय, त्याला माझा पाठिंबा आहे. साधू आले, गेले तरी त्याने काही फरक पडत नाही. याविषयी माझा अभ्यास नाही. पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल. इथलं एकही झाड तुटता कामा नये. ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसांनी आपल्याला फसवलं तर त्यांना आपलं कसं म्हणायचं, शासन आपलं आहे की, इंग्रजांचं राज्य आहे? आपल्याला झाडांची वयाची व्याख्याच माहिती नाही, तशी व्याख्या करणं महाराष्ट्र सरकारला जमलेले नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय. ही मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देणारी असतात, त्यांची मोठी पानं जास्त कार्बन घेतात, ऑक्सिजन देतात. वडाच्या झाडावर पाचशे सहाशे प्रजाती जगतात. अशी झाडं तोडली तर त्याला माफी नाही. झाडं ही आपली आईबाप आहेत. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही मुलं काही इतकी बुळगी नाही. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा