Raj Thackeray: नाशिकमध्ये साधूग्राम उभारण्याच्या नावाखाली 1800 झाडांची होणारी कत्तल हा विकासाच्या आड लपलेला विनाशाचा अजून एक नमुना असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी भाजप सरकारने कोट्यवधी झाडं लावल्याचा दावा केला होता, ती झाडं कुठे दिसली नाहीत, असे सांगत तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख न करता टोला लगावला आहे. मुनगंटीवार 33 कोटी वृक्ष लागवड राबवली होती. मात्र, या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र त्यांनाही 'क्लीन चिट' मिळाली. आता मंत्री गिरीश महाजन यांनी एका झाडाच्या बदल्यात पाचपट झाडे लावण्याची भाषा केली जात आहे. यावरून राज ठाकरे यांनी मुनगंटीवार यांचा उल्लेख न करता गिरीश महाजन यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे वर्तुळ हे सध्या उद्योगपतींचे दलाल म्हणून फिरताना दिसत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
नाशिकमध्ये कुंभमेळा पहिल्यांदाच होत नाही
आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राज ठाकरे यांनी सवाल करताना स्पष्ट केलं की, नाशिकमध्ये कुंभमेळा पहिल्यांदाच होत नाही. मनसेच्या महापालिकेच्या सत्ताकाळातही कुंभमेळा झाला होता, आणि त्यावेळी कोणतीही झाडं न कापता मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या होत्या. त्या काळी नगरसेवक–प्रशासन यात झालेल्या समन्वयामुळे नागरिकांच्या गरजांचा आदर राखला गेला होता आणि त्याच कामगिरीचा गौरव अमेरिकेतही झाला होता, हेही त्यांनी सांगितले.
अचानक 1800 झाडं तोडण्याची गरज का निर्माण झाली?
मग आता अचानक 1800 झाडं तोडण्याची गरज का निर्माण झाली, असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला केला. झाडांची तोडफोड करून दुसरीकडे भरपाई म्हणून झाडं लावण्याच्या पोकळ आश्वासनांची त्यांनी खिल्ली उडवत म्हटलं की, अशी झाडं कुठेच उगवत नाहीत आणि सरकारलाच जर पाचपट झाडं लावायला जागा असेल, तर साधूग्रामसाठीची जागा तिथेच का शोधली जात नाही? साधूंच्या नावाखाली उद्योगपतींचे हित साधण्याचा प्रयत्न सुरू असून, जमीन सपाट करून पुढे ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचाच हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध असून, त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची हमी मनसेने दिली आहे. “हे कोणत्याच निवडणूक राजकारणासाठी नाही; या निवडणुकांनंतरही आमचा विरोध कायम राहील,” असे स्पष्ट करत राज यांनी सरकारला संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला. मात्र सरकारने संघर्षाची भूमिका घेतली, तर जनतेच्या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रभागी उभी राहील, असा इशारा देत त्यांनी ही झाडतोड तत्काळ थांबवण्याची मागणी केली.
इतर महत्वाच्या बातम्या