Continues below advertisement

नाशिक : शहराकडे धाव घेतलेल्या बिबट्याची (Leopard) गंभीर समस्या बनली असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही बिबट्याचा मुद्दा गाजला होता. पुणे जिल्ह्यात बिबट्याची संख्या मोठी असून शासनाने या बिबट्यांपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी काही पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचेही वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले होते. मात्र, गावखेड्यात अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. आता, नाशिकच्या सिन्नर (Nashik) तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तरुण आणि बिबट्या दोघे विहिरीत पडले आणि दोघांचाही मृत्यू झाला आहे.

सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात गोरख जाधव हा तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला होता, सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास विहिरी जवळ जेवण करण्यासाठी बसला असता अचानक बिबटयाने त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी घाबरलेल्या गोरखने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी स्वत:चा जीव वाचविण्याची धडपड करताना तो शेतातील विहिरीत पडला. मात्र, तरुणाचा पाठलाग करणाऱ्याने बिबट्याने पाठोपाठ विहीरीत उडी घेतली. याबाबत, ग्रामस्थांना माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस अधिकारी यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बिबट्या विहिरीत असताना गोरखला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. मात्र, स्थानिकांच्या मदतीने पिंजरा लावून वन विभागाने बिबट्याला जेरबंद केले. तर, जीवरक्षकांच्या माध्यमातून गोरखचा विहिरीच्या तळाशी शोध सुरू केला, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर, संबधितांनी विहिरीतून गोरखचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी, गावातील तरुण गेल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत बिबट्याला बाहेर काढण्यास विरोध केला होता. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बिबट्या देखील 2 ते 3 तास पाण्यात असल्याने बिबट्याचाही मृत्यू झाल्याची घटना घडली.

Continues below advertisement

दरम्यान, शेतातील तरुणावर केलेल्या आजच्या घटनेच्या आधीच काही वेळापूर्वी या बिबट्याने आणखी एका नागरिकावर हल्ला केला होता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे, ह्या थरारक घटनेने ग्रामस्थ बिबट्याच्या दहशती सावटाखाली आहेत.

हेही वाचा