नाशिक : राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच तिकडे नाशकात दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनही झाल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याचं दिसून आलं. शिवसेना ठाकरेंच्या जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशींसह अनेक पदाधिकारी मनसे कार्यालयात उपस्थित राहिले. त्यामुळे डोंबिवलीनंतर आता नाशकातही दोन्ही ठाकेरेंचे कार्यकर्ते मनाने एकत्र आले.
Nashik MNS Shiv Sena Alliance : मनसेच्या वास्तूशांतीच्या पूजेला ठाकरेंचे कार्यकर्ते
एकीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चेने जोर धरला असताना नाशिकमध्ये त्यापुढचे पाऊल पडले आहे. नाशिक मनसेने त्यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी वास्तूशांती पूजेचे आयोजन केले होते. त्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होताना दिसत आहे.ट
MNS Shiv Sena Alliance : शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक फोटोही आणला होता. त्यामध्ये 'हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र' असा उल्लेख केला होता. या फोटोवर उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता.
भारतीय जनता पार्टीने हिंदुत्व हिंदुत्व करत हिंदुत्वाचा अपमान केला असल्याचा आरोप यावेळी नाशिकच्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज असल्याचं मतही या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. मराठी माणसाच्या हितासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे हीच सर्वसामान्य माणसाची आणि कार्यकर्त्याची भावना असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं.
Amit Thackeray On Shiv Sena MNS : दोन्ही नेत्यांनी फोन करावा, अमित ठाकरेंचा सल्ला
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगलीय ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांनी तसे संकेतही दिलेत. अशातच आता ज्युनियर ठाकरेंही, युतीवर व्यक्त होऊ लागलेत. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर गुरुवारी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही, एकत्र येण्यावर काहीच हरकत नसल्याचं सूचक वक्तव्य केलं. त्यांनी या आधी मनसेकडून दोनवेळा तसा प्रयत्न झाल्याची आठवण करून दिली. आता दोन्ही नेत्यांची इच्छा असेल तर फोन करावा असा सल्ला त्यांनी केली. त्यामुळे उत्सुकता लागून असलेल्या ठाकरे बंधुंचा, युतीबाबतचा अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.