Nashik News: नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गा प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली असून याप्रकरणी खुलासा मागितला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत नाशिक महापालिकेने 1 एप्रिलला दर्गा अनधिकृत ठरवत 15 दिवसांच्या आता अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा महापालिका (Nashik Mahanagarpalika) अतिक्रमण काढेल अशी नोटीस बजाबली होती. या नोटीसला दर्ग्याच्या (Satpeer dargah) विश्वस्त मंडळाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकाकर्तेचे म्हणणे ऐकून घेतले नाही, तातडीची सुनावणी केली नाही असा दावा करत दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी बुधवारी सुनवणी पार पडली, सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित केले.
याचिकेवर तातडीने सुनावणी का केली नाही, असा सवाल उपस्थित करत मनपच्या नोटीसला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने आपला खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सूनवणी होण्या आधीच दर्गाचे बांधकाम महापालिका ने पोलीस बंदोबस्तात हटविले असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणी कडे लक्ष लागले आहे, याप्रकरणी पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार असून महापालिका काय बाजू मांडणार याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणी वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आधीच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयात दर्गा किती जुना आहे याबाबत सबळ पुरावे ट्रस्ट दाखल करू शकला नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते. त्या निर्णयाचा आधार घेत महापालिकेने नोटीस बजावली होती. वक्फ बोर्डात हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने मनपाच्या नोटीसला सर्वोच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टने आव्हान दिल्याने महापालिकेची कारवाई चर्चेत आली आहे.
नाशिक महानगरपालिकेने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता सातपीर दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दोन जेसीबी व अन्य यंत्रणा कामाला लावून नाशिक महानगरपालिकेने हा दर्गा जमीनदोस्त केला होता. तसेच दर्ग्याचे तोडकाम केल्यानंतरचा राडारोडा तातडीने इतरत्र हलवला होता. त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये दर्ग्याची जागा पूर्णपणे मैदानासारखी मोकळी झाली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या 'कार्यतत्परतेमुळे' या जागेवर आता दर्ग्याचे नामोनिशाणही उरलेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Nashik News: दर्ग्याच्या तोडकामाला विरोध, पोलिसांवर दगडफेक
सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्यापूर्वी मंगळवारी रात्री या परिसरात पोलीस आणि पालिकेच्या पथकाला जोरदार विरोध करण्यात आला. याठिकाणी असलेल्या जमावाने पोलिसांवर आणि पालिकेच्या पथकावर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या दगडफेकीत तब्बल 31 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 15 जणांना ताब्यात घेतले होते.
आणखी वाचा
नाशिकच्या सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतरचे फोटो समोर आले, आता ती जागा कशी दिसते?