नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Mahadev Temple) परिसरातील रस्त्यांना आले नद्यांचे रूप आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली होती.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण 80 टक्क्यांहून अधिक भरले आहे. चार ते पाच तालुक्यांत पावसाने जोर घेतल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरलं पाणी
त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेले. यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरासह बाजारपेठ, मेनरोड, तेली गल्लीत देखील पाणी शिरले आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
गंगापूरमधून विसर्ग वाढवला
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले होते. तर दुपारी 3 वाजता एकूण 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दुपारी चार वाजेपासून 4 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूरसह दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून ही विसर्ग सुरु असल्याने जायकवाडीला नाशिकचे पाणी मिळणार आहे.
सोमेश्वर धबधबा प्रवाहित
नाशिक शहर परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यानं नाशिकचा सोमेश्वर धबधबाही प्रवाहित झालाय. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणातून नदी पात्रात येणारे पाणी आणि सोमेश्वर धबधबा परिसरात मिसळणारे पाणी यामुळे सोमेशवर धबधबा धो धो कोसळतो आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सोमेश्वर धबधबा कोसळतोय. त्यामुळे धबधब्याचे "फर्स्ट लूक" बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
आणखी वाचा