Nashik graduate constituency  elections: पहिल्या दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असून  निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज सकाळी आठपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 


नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली आहे. त्यात आज मतदानाचा दिवस उजाडला असून मतदानाला शांतपणे सुरुवात झाली आहे. एकीकडे ही निवडणूक कधी यायची अन् होऊन जायची कळायचं नाही. मात्र, यंदा नाशिक पदवीधर निवडणूक सर्वश्रुत झाली आहे. त्यामुळे मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार आहे.


नाशिक विभागात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार आहेत. आज सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. 


दरम्यान, नाशिक विभागात सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात आहेत. अहमदनगरमध्ये 1 लाख 15 हजार 638 मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652, जळगाव जिल्ह्यत 35 हजार 58, धुळे जिल्ह्यात 23 हजार 412, नंदूरबार जिल्ह्यात 18 हजार 971 इतके मतदार आहेत.


338 मतदान केंद्रावर मतदान


नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या 147 इतकी आहे.  नाशिकमध्ये 99, जळगाव जिल्ह्यात 40, धुळ्यात 29 आणि नंदूरबार जिल्ह्यात 24 मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत.


मतदानासाठी दहा पुरावे ग्राह्य


दरम्यान मतदानासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र अथवा भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत उमेदवारांचा जोश तर मतदारांची उदासीनता, नेमकं घडणार काय?