नाशिक : ओझर विमानतळावरून (Ozar Airport) देशांतर्गत सुरु आहे. मात्र आता ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांचे (International Flights) देखील उड्डाण होणार आहे. पुढील महिन्यात अर्थात 12 सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण सुरु होणार होणार असल्याने नाशिककरांसाठी ही विमानसेवा फायद्याची ठरणार आहे.
सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून 'इंडिगो'ची (Indigo Airlines) नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, गोवा आणि नागपूर या ठिकाणांसाठी सेवा सुरू आहे. मात्र आता नाशिकहून आंतरराष्ट्रीय सेवा सुरु होणार असल्याने नाशिकला काही नवे देश जोडले जाणार आहेत.
तिकिटांची बुकिंग सुरू
नाशिककर आता सिंगापूर, बाली, श्रीलंका, थायलंड या पर्यटनासाठी प्रसिद्ध देशात कमी वेळात पोहोचू शकणार आहे. दररोज सायंकाळी 4:50 वाजता हे विमान नाशिक येथून उड्डाण घेणार आहे. विमानांच्या तिकिटांची बुकिंग सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर कंपनीने वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.
नव्याने जोडले जाणारे देश आणि विमानांची वेळ
नाशिक - बाली (सायं. 4:50 ते रात्री 10:20)
नाशिक- बँकॉक (सायं. 4:50 ते रात्री 11:20)
नाशिक - कोलंबो (सायं. 4:50 ते रात्री 12:55)
कोलंबो- नाशिक (सकाळी 7:30 ते 4:20)
नाशिक- सिंगापूर (सायं. 4:50 ते पहाटे 4:30)
नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार
दरम्यान, आंतरराष्टीय विमानसेवा सुरु होण्यासोबतच देशांतर्गत विमानसेवा देखील वाढणार आहे. यात सप्टेंबरपासून जम्मू, श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, वाराणसी, जयपूरसह अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. इंडिगो एअर लाईन कंपनीकडून नाशिकहून देशातील अनेक प्रमुख शहरात विमानसेवा सुरु केली जात आहे. नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याने आता नाशिकमधील उद्योग, पर्यटनासह अन्य क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार आहे.
कनेक्टिंग फ्लाइट्सचा पर्याय चांगला
बेंगळूरू विमानामुळे नाशिकला काही नवे देश जोडले जाणार आहेत. त्यात सिंगापूर, बाली, श्रीलंका, थायलंड यांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक ते नवी दिल्ली व हैदराबाद या विमानांनाही कंपनीने आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली असून, त्यामुळे नाशिककर अबुधाबी, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, लंडन, न्यू यॉर्क, पर्थ, पॅरिस, रोम, शारजा, सिडनी, व्हिएन्ना, झुरीच ही शहरे 'हॉपिंग फ्लाइट' द्वारे गाठू शकणार आहेत. संबंधित ठिकाणी प्रवाशांना काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी या शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सध्या नाशिककरांना मुंबई गाठावी लागते. त्यात सुमारे सहा ते आठ तासांचा वेळ जातो. त्याऐवजी कनेक्टिंग फ्लाइट्सचा पर्याय चांगला ठरू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.
आणखी वाचा