Nashik News : नाशिक शहरातील उंटवाडी परिसरात असलेल्या बाल निरीक्षण गृहातील एक अल्पवयीन मुलगी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता (Nashik Girl Missing) असल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुलीच्या पालकांनी निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांवर थेट ‘मुलीची विक्री’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी 22 मे रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. यानंतर वावी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल करण्यात आली. काही दिवसांतच ही मुलगी पुणे जिल्ह्यात सापडली. तिच्यासोबत असणाऱ्या तरुणावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. तर, पीडित मुलीला पुढील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक महिन्यासाठी नाशिकमधील उंटवाडी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले.
15 दिवस झाले तरी संबंधित मुलगी निरीक्षण गृहातून गायब
मात्र, आता 15 दिवस झाले तरी संबंधित मुलगी निरीक्षण गृहातून गायब आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, बाल निरीक्षण गृहामध्ये सीसीटीव्ही असूनही मुलगी कशी बाहेर गेली, याचा ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. तसेच, अशा ठिकाणी दिवस-रात्र कर्मचारी असतानाही एका अल्पवयीन मुलीचा पत्ता लागू न शकणं ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
पालकांचा गंभीर आरोप
या घटनेने हतबल झालेल्या मुलीच्या पालकांनी थेट बाल निरीक्षण गृहावरच गंभीर आरोप केले आहेत. निरीक्षण गृहात मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी असताना देखील मुगली बाहेर कशी गेली? 15 दिवसापासून मुलीचा शोध का लागला नाही? असा सवाल मुलीच्या पालकांनी उपस्थित केला आहे. बाल निरीक्षण गृहातील लोकांनी मुलीची विक्री केल्याचा गंभीर आरोप देखील मुलीच्या पालकांनी केला आहे. तर दोन दिवसात तपास लागला नाही तर निरीक्षण गृहाच्या गेटवर आत्मदहन करण्याचा इशारा देखील पालकांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik News : नाशिक हादरले! ऑनलाइन गेमने घेतला 16 वर्षीय मुलाचा जीव; पैसे हरल्याने उचलले टोकाचे पाऊल