Nashik News : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) येऊन ठेपलेला असताना, नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अखेर महापालिकेने (Nashik NMC) मोठा दिलासा दिला आहे. मंडप शुल्क व जाहिरात कर माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यामुळे सणाच्या तोंडावर निर्माण झालेला तणाव निवळला आहे.
गणेशोत्सव मंडळांचा आक्रमक पवित्रा
नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाच्या नेतृत्वाखाली अनेक मंडळांनी महापालिकेच्या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. परवानगीसाठी आवश्यक असलेले मंडप शुल्क आणि जाहिरात कर आकारण्याच्या निर्णयाविरोधात मंडळांनी रोष व्यक्त करत शुल्क माफ न झाल्यास मंडप व आरास बंद ठेवून उत्सवावर बहिष्कार टाकू, असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिला होता.
राज्यभरात शुल्क माफी, नाशिकमध्ये नाराजी
राज्यातील इतर महापालिकांनी गणेशोत्सव मंडळांना सूट देत मंडप शुल्क व जाहिरात कर माफ केला होता. नाशिकमध्ये मात्र अशी माफी दिली जात नसल्याने गणेश मंडळांच्या नाराजीला उधाण आले होते. “गेल्या काही वर्षांत महापालिकेने असेच सवलतीचे धोरण स्वीकारले होते, मग यंदा दिरंगाई का?”, असा सवाल मंडळांकडून उपस्थित करण्यात येत होता.
गिरीश महाजन यांची भूमिका ठरली निर्णायक
उद्भवलेला वाद मिटवण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर महापालिकेने अखेर नमते घेत, मंडप शुल्क व जाहिरात कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे सणाच्या तोंडावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाला विराम मिळाला आहे. आता शहरातील गणेश मंडळ उत्सवाच्या तयारीला अंतिम रूप देत असून, विविध ठिकाणी मंडप उभारणी, मूर्ती प्रतिष्ठापना, आरास, सांस्कृतिक कार्यक्रम यांची लगबग सुरू झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या