नाशिक : सर्वोच्च न्यायालयामध्ये आज ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थातच, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणासहित होणार आहे. त्यामुळे नाशिक मनपा निवडणुकीमध्ये 36 जागांवर ओबीसी आरक्षण असणार आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा तिढा न्यायालयात प्रविष्ट होता. अखेर आज अनेक वर्षानंतर हा तिढा सुटल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण असणार आहे. नाशिक महापालिकेत यंदा अकरा नगरसेवकांची वाढ होऊन नगरसेवक संख्या 122 वरून 133 वर गेली आहे. तर महिला आरक्षणासह (Women Reservation) इतर आरक्षण यापूर्वीच प्रभाग निहाय झाले आहे. तसेच आज ओबीसी आरक्षण लागू झाल्याने आणखी 104  प्रभागांमध्ये सुमारे 36 जागा राखीव होण्याची शक्यता असून उद्या नाशिक महापालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.


नाशिक मनपा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 54 जागा असतील. 12 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर अनुसूचित जमाती प्रवासासाठी एक जागा असेल. राज्यात ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण आहे. काही स्थानिक स्वराज संस्थांमध्ये एकूण आरक्षणाच्या 50 टक्क्यांवर वर जात असल्याने यासंदर्भात न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती.


आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 27 टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस केली आहे. अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे. हे 27 टक्के आरक्षण 133 वर मिळणार की 29 जागी अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण झाल्यामुळे 104 खुल्या जागांमध्ये 27 टक्के आरक्षण मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत निवडणूक आयोगाचे सूचना आल्यानंतर निर्णय होणार असल्याचे समजते. तरी नाशिक महापालिकेतची निवडणूक ओबीसी आरक्षणासह होत असल्यामुळे ओबीसी नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


दरम्यान पुढील काही महिन्यात नाशिक महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना, महिला आरक्षण आदींसह मतदार याद्यांचे काम प्रगतीपथावर आहे. अशातच आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने नाशिक महापालिका निवडणुकीत रंगत येणार आहे. 


पावसामुळे निवडणूक लांबण्याची शक्यता
नाशिक शहरात सुरुवातिला कमी तर शेवटच्या काळामध्ये भरपूर पाऊस पडतो. असा आजवरचा अनुभव आहे. यामुळे सप्टेंबर मध्ये पाऊस जास्त राहणार आहे तर निवडणूक पावसाळ्यानंतरच घेण्यात येणार असल्यामुळे नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट कायम राहणार आहे, तर निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते.