नाशिक : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्स प्रकरणी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह संजय राऊतांवरही (Sanjay Raut) गंभीर आरोप केले आहेत. ललित पाटीलने अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला नसल्याचा आरोप निलम गोऱ्हे यांनी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आपल्या पक्षातील लोकं काय करतात हे बघणं उद्धव ठाकरेंसोबतच सर्वज्ञानी संजय राऊत यांचीही जबाबदारी आहे.' तर या प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे देण्याच्या सूचना विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सरकारला दिल्या आहेत.
ललित पाटील याने 2016 साली शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. पण त्यावेळी शिवसेना पक्ष हा एकत्र होता. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकराची फूट पडली नव्हती. ललित पाटीलने जेव्हा पक्षप्रवेश केला त्यावेळीच्या फोटोंमध्ये दादा भुसे हे देखील दिसत होते. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेकांनी शिंदें गटाचा मार्ग स्वीकारला पण ललित पाटील हा मात्र त्यानंतर कोणत्याही चर्चेत आला नाही. त्यामुळे तो अजूनही ठाकरे गटातच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
तसेच या तपासामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय अभ्यास असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यंचा समावेश करण्यात यावा अशी मागणी देखील निलम गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे. तर या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनही तितकच जबाबदार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं. एवढा बेकायदेशीर ड्रग्स कारखाना सुरू असतांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष कसं होऊ शकतं असा सवाल देखील निलम गोऱ्हे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात औषध मंत्र्यांनी दखल घ्यावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
निलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
ड्रग्सचे पुणे, नाशिक, मुंबईत धागेदोरे असून अशाप्रकारच्या अवैध्य धंद्यांना कोण आश्रय देतं तसेच त्यांना कशामुळे प्लॅटफॉर्म मिळतो असे सवाल निलम गोऱ्हे यांनी या निमित्ताने उपस्थित केले आहेत. पुढे बोलताना निलम गोऱ्हेंनी म्हटलं की, '2016 साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील याने पक्षात प्रवेश केला. आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात ही जबाबदारी जशी उद्धव ठाकरेंची होती तशीच ही जबाबदारी संपर्क प्रमुख संजय राऊत यांची देखील होती.' 2016 मध्ये तो पक्षात आला होता त्यानंतर तो पक्षाच्या बाहेर गेला कधी गेला, दुसऱ्या पक्षात तो काम करायला लागला का यांसारखे प्रश्न निलम गोऱ्हे यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान 'त्याने अजूनही पक्ष सोडला नाही किंवा राजीनामा देखील दिला नाही, हे राजकारण योग्य नाही', असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
तर आता या ललित पाटील प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ललित पाटील हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून यामध्ये कोण कोण सामील होतं यांची नावं तो सांगणार असल्याचा खुलासा यावेळी ललित पाटील याने माझाच्या कॅमेरामध्ये केला आहे.