नाशिक : राज्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेला कांदा (Onion) व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सोमवार (2 ऑक्टोबर) रोजी कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. व्यापाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतल्यामुळे कांद्याचे लिलाव पुन्हा एकदा बुधवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे. तर याच बैठकीमध्ये कांदा लिलाव पुन्हा सुरु करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात झालं आहे. पण एक महिन्याच्या आत आमच्या अडचणी केंद्र आणि राज्य सरकारने सोडवाव्यात असा थेट  इशारा या कांदा व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. 


मागील अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक बाजारपेठांमधील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. तर केंद्र आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही लिलाव पुन्हा सुरु करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे शेतकरीवर्ग देखील चिंतेत सापडला होता. दरम्यान यासाठी कांदा व्यापारी, शेतकरी संघटनांची बैठक देखील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली होती. पण या बैठकीमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आला नाही. 


दादा भुसेंनी घेतली कांदा व्यापाऱ्यांची भेट


दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान प्रशसनाने दिलेल्या अल्टिमेटमनंतर व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. तर मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करुन व्यापाऱ्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. 


बैठकीत काय झालं?


या बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांनी पुढील 13 दिवसांमद्ये व्यापाऱ्यांवर बाजार समितीने केलेल्या कारवाया मागे घेण्याती येतील अशी घोषणा केली. तसेच याबाबत  जिल्हा उपनिबंधक सकारात्मक निर्णय घेतील असं देखील यावेळी दाद भुसे यांनी यावेळी म्हटलं. या बैठकीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी त्यांचा बंद मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला. नाशिक  जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी हा निर्णय जाहीर केला. दरम्यान दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कांदा लिलाव पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसेच येत्या बुधवारपासून म्हणजेच (4 ऑक्टोबर) पासून कांदा लिलाव पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.  


गेल्या 13 दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे, या व इतर मागण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती लिलाव बेमुदत बंद ठेवले होते. परंतु आता हे लिलाव पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. 


हेही वाचा : 


Nashik News : नाशिकच्या विंचूर पाठोपाठ निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, व्यापारी वर्गात दुफळी? कांद्याची 'कोंडी' फुटणार...