Nashik Latest Rain updates : नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसात नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain Update) तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन  दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज नाशिक शहरात पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान जिल्ह्यातील काही भागात आलेल्या पूरात तीन जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


दरम्यान, दिंडोरी तालुक्यात कोचरगाव येथे काका पुतणी आळंदी नदीच्या पुरात वाहून गेल्याचे समजते. कोचरगाव येथील भोलेनाथ लिलके आणि त्यांची सहा वर्षाची पुतणी  विशाखा बुधा लिलके हे शेतातील घरी जात होते. यावेळी आळंदी नदी पार करताना दोघेही नदीच्या पूरात वाहून गेले. त्यातून भोलेनाथ लिलके हे पोहून बाहेर आले. मात्र विशाखा नदीच्या पात्रात वाहून गेली आहे. घटनेनंतर शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील पोपट रामदास गांगुर्डे ही व्यक्ती कालपासून बेपत्ता असून सदर व्यक्ती किकवी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, स्थानिक पातळीवर शोधकार्य सुरू आहे.


नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे  धरणे तुडुंब आहेत. काही धरणांतून विसर्ग करण्यात येत असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान या पुरात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिघेजण वाहून गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


नाशिक शहरात पाऊस थांबला!
Nashik Rain Update : एकीकडे नाशिक जिल्ह्यास पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मागील तीन दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर आज सकाळपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र गंगापूर धरणांतून विसर्ग सुरू असल्याने गंगेचा पूर जैसे थे आहे.