त्र्यंबकेश्वर : श्रावण सुरु झाला (Shravan Month) असून उद्या पहिला श्रावणी सोमवार (Shravani Somwar) असल्याने त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून श्रावण महिन्याचे नियोजन करण्यात आले आहे. पार्किंग, सीसीटीव्ही, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आदींसह कुशावर्त स्नान आणि ब्रम्हगिरी फेरीच्या निमित्ताने चोख नियोजन केले आहे. 


त्र्यंबकेश्वरला श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी देशभरातून दाखल होत असतात. श्रावण मासात ब्रम्हगिरी प्रदक्षिणा (Bramhgiri Feri), कुशावर्त स्नान, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन (Trimbakeshwer Darshan) यासह काही भाविक ब्रम्हगिरीवर जाऊन आनंद घेत असतात. या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यात मोठी गर्दी होते. त्यातल्या त्यात प्रत्येक श्रावणी सोमवार आणि विशेषतः तिसऱ्या श्रावणी सोमवारी तर सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीसारखा गर्दीचा अनुभव येत असतो. यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासनाने (Nashik Police) बैठक घेत श्रावण महिन्याचे नियोजन केले आहे. 


याच पार्श्वभूमीवर भाविकांनी कमीत कमी सामान आणावे, मौल्यवान वस्तू शक्यतो टाळाव्यात, मंदिरात बॅग्स आणि पिशव्यांनाही बंदी घालण्यात आली असून संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच श्रावण मास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रावण मासात येणा-या भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या 'श्रावण महिना नियोजन' बैठकीत केले आहे. 


पोलिसांकडून काय काय व्यवस्था? 



दरम्यान पोलीस प्रशासनाकडून त्र्यंबकेश्वर शहर व मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, वाहतुकीचे नियंत्रण व नियोजन, फेरी मार्गावरील कायदा व सुव्यवस्था राखणे, हॉटेल्स व इतर ठिकाणी होणाऱ्या अवैध मद्यविक्रीबाबत पोलीस कारवाई करतील. सर्व हॉटेल्स, बसस्थानक याठिकाणी विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात येतील. सर्व मार्गावरील वाहनांची तपासणी करण्यात येईल. अवैध वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येईल. गावात वाहनांची कोंडी होऊ नये म्हणुन खंबाळे येथे तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. अंबोली, तळवाडे फाटा, पहिने (भिलमाळ), अंबोली येथे तात्पुर्ती वाहनतळावर उभारण्यात येतील. 


त्र्यंबक प्रशासनाकडून काय काय व्यवस्था? 


त्र्यंबकेश्वर शहरातील कुशावर्त तीर्थावरील पाणी शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर तात्पुरते शौचालय (कुशावर्त तीर्थ, निर्मळवारी, फेरी मार्गातील पार्किंग, पिण्याचे पाणी व्यवस्था, पथदिवे, सुरक्षारक्षकांची नेमणूक, सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांसाठी 'तात्पुरता 'निवारा शेड,भाविकांसाठी फिरते व स्थायी आरोग्य पथक, अँब्युलन्स, ब्रम्हगिरी, गंगाद्वार, फेरीमार्गावरील धोकेदायक परिसरात अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती, पर्यावरण व वन्यजीव तसेच प्रदक्षिणा मार्गावरील शेतातून चालून शेतीचे नुकसान होणार नाही, याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. 



आरोग्य व्यवस्था कशी असेल? 


श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडत असतात. त्याचबरोबर ब्रम्हगिरी फेरीसाठी देखील लाखो लोक येत असतात. या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयामार्फत त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर, त्याचबरोबर धाडोशी, पेगलवाडी, सापगाव फाटा या ठिकाणी फिरते आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच चारही वाहनतळावर आरोग्य पथक नियुक्त असेल. यासाठी डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक आदी तैनात असतील. पुरेसा स्टाफ, डाॅक्टर्स औषधांसह सज्ज असणार आहेत. 


 


संंबंधित बातमी : 


Trimbakeshwar News : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी असं असणार टाईमटेबल