नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची (Protest) हाक दिली आहे. 'जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवर चर्चा करत नाही, तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील, त्याचबरोबर लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी होणार नाही, असा इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक (Nashik Onion Issue) जिल्ह्यात कांदा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता
कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लासलगावसह (Lasalgaon) जिल्ह्यातील 17 बाजार समितीमध्ये लिलावात आजपासून सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होणार असून कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. परंतु बैठक होऊनही तोडगा न निघाल्याने व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. 'जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवर चर्चा करत नाही, तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील, लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी होणार नाही, असा इशारा कांदा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, मागील आंदोलनावेळी सरकारने दिलेलं आश्वासन अद्यापही पाळलेलं नाही. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे येत्या काळात सरकारसोबत बैठकीचे आश्वासन दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून व्यापारी वर्ग दयनीय अवस्थेत असून मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांना पत्रव्यवहार केला असून त्यांनी चर्चा करावी, अन्यथा आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचा आक्रमक इशारा व्यापारी वर्गाकडून देण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळपासून बाजार समित्या (Bajar samiti) बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
आता कांदा व्यापाऱ्यांकडून बंद
सध्या उन्हाळ कांदा बाजारात येत असून लासलगाव बाजार समितीमध्ये रोज बाराशे ते तेराशे वाहनातून कांदा विक्रीला येत असतो. काही दिवसांपूर्वीच कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र होते, मात्र आता कांदा व्यापाऱ्यांकडून बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश कांद्याची उलाढाल ही नाशिक जिल्ह्यातून होत असते. त्यातच लासलगाव ही कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आता या बाजार समित्या जास्त दिवस बंद राहिल्यास आवक वाढून बाजार भाव पुन्हा घसरण्याची शक्यता आहे आणि याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
काय आहेत मागण्या?
केंद्राने नाफेड व एनसीसीएफ मार्फत साठवलेला पाच लाख टन कांदा रेशनवर विक्री करावा, तसेच दैनंदिन मार्केटमध्ये कांदा 2410 व त्यापेक्षा अधिक दराने खरेदी करावा, बाजार समितीने मार्केट तिचा दर प्रति शेकडा 100 रुपयात एक रुपया ऐवजी तो 0.50 पैसे या दराने करावा. आरतीचे दर देशात एकच दराने व वसुली खरेदी दाराकडून किंवा विक्रेत्यांकडून करावी, कांद्याची निर्यात होण्यासाठी 40 टक्के ड्युटी तत्काळ रद्द करावी आदी मागण्या व्यापारी असोसिएशनकडून करण्यात आल्या आहे. यात केंद्र सरकारने लावलेले 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ कमी करण्याची प्रमुख मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी :