Nashik Latest News : वेळ दुपारी एक वाजेची. शहरातील औदुंबर परिसर. पावसाची उघडीप. तेवढ्यात येथून जाणारी मोलमजुरी करणारी महिला. अचानक बाळंत होते, अन सर्वांच्याच काळजात चर्र होतं. पंचवटी परिसरातील प्रभाग क्रं. पाच मधील औदुंबर येथील मन सुन्न करणारी घटना. सदर घटनेचा आनंद मानावा कि दुःख असा प्रश्न पडला आहे. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील औदुंबर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (दि.२९) दुपारी आठ महिन्याची गर्भवती असलेल्या एका महिलेची प्रसूती झाली. विशेष म्हणजे यावेळी माणुसकीला जाग आली आणि प्रसूती झालेल्या महिलेची स्थानिक माजी नगरसेवक प्रियांका माने यांच्या पतीसह स्थानिक महिलांनी समय सूचकता दाखवीत प्रसूती झालेल्या महिलेला सुखरूप दवाखाण्यात पोहचवले. 

 

नाशिकच्या औदुंबर नगर, अमृतधाम येथील रस्त्यावरून मोलमजुरी करणारी शितल विकी कांबळे ही गरोदर महिला जात असतांना त्या महिलेच्या पोटात कळा सुरू झाल्या. यावेळी ती महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसली. काही वेळातच त्याच ठिकाणी प्रसूती झाली. ही बाब स्थानिकांना कळताच स्थानिक महिलांनी व नागरिकांनी जवळच असलेले प्रख्यात डॉ.राजेंद्र बोरसे व प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांना फोन केला. डॉ.राजेंद्र बोरसे हे त्यांच्या क्लिनिक मध्ये असलेले पेशंट सोडून तात्काळ ज्या ठिकाणी महिला डिलिव्हरी झाली त्या ठिकाणी पोहोचले. त्या महिलेची डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली.  यावेळी त्या महिलेने दोन जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. तोपर्यंत प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांनी प्रभागातील मनपाचे आरोग्य केंद्रातील डॉ.बेस्ते यांना घटनेची माहिती कळवली. डॉ.बेस्ते हे दोन महिला परिचारिकासह तात्काळ दाखल झाले. 

 

त्याचबरोबर पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर यांना माहिती मिळताच लोकमान्य हॉस्पिटलची रुग्णवाहिका बोलवण्यात आली. सदर महिलेला इंदिरा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले. सध्या प्रसूती झालेली महिला शितल विकी कांबळे, नवजात दोन्ही जुळ्या मुली या सुखरूप असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत सुरू होती. त्यावेळी सदर महिलेच्या आम्ही दोघेही पती पत्नी जागेवरून उठलो. महिलेची स्थिती पाहून तात्काळ डॉक्टरांना पाचारण केले. स्थानिकांच्या व डॉक्टरांच्या रूपाने देवच धावून आला. व महिलेची पुढील कार्यवाही सुखरूप झाली, आशा भावना यावेळी सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने यांनी व्यक्त केल्या.