नाशिक : राज्यातील काही भागात हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार दिवसभर कडाक्याचं ऊन असलेल्या नाशिक शहरात सायंकाळी हलक्या सरींनी वर्षाव केला. यावेळी नाशिककरांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर नवरात्रीच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या भाविकांना देखील आडोसा शोधावा लागला. 


नाशिक शहरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यानंतर शहरासह जिल्ह्यात उन्ह वाढलं होत. तर सायंकाळी हवेत गारठा जाणवत होता. त्यामुळे पावसाच्या आशा धूसर झालेल्या होत्या. मात्र आज हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला होता. नाशिकसह पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार आज दिवसभर जरी ऊन असलं तरी सायंकाळी साडेसहा वयाच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या सरांनी वर्षाव केला. यावेळी नाशिककर मोठ्या उत्साहाने बाहेर पडले होते, कुणी खरेदीसाठी तर कुणी देवी मंदिर दर्शनासाठी तर कुणी कामावरून घरी परतत असताना अचानक पावसाचे आगमन झाले. यावेळी नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. 


एकीकडे ऑक्टोबर हिटचा उकाडा जाणवायला सुरुवात झालेली असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई नाका परिसरात कालिका देवीच्या नवरात्रात्सोव निमित्ताने यात्रा भरली असून अचानक आलेल्या या पावसाने विक्रेत्यांसोबतच भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून बचावासाठी भाविक अडोसा शोधत होते तर दुसरीकडे विक्रेते आपले साहित्य झाकण्यासाठी धावपळ करत होते. यात्रेनिमित्ताने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना देखिल पावसामुळे छत्रीची शोधाशोध करावी लागत होती. तर शहरातील कॉलेजरोड परिसरात झाडंही कोसळल्याचे दिसून आले. आज नाशिकमध्ये हलक्या सारी बरसू शकतात असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता, त्यानुसार काही वेळ आलेल्या पावसाने उकाड्यात नाशिककरांना सुखद धक्का दिला. 


बुधवारीही जोरदार पावसाची हजेरी


देशासह राज्यातून अद्याप पावसाने (Monsoon) पूर्णपणे माघार घेतलेली नाही. राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यानुसार भारतीय हवामान विभागाने (IMD) 17 आणि 18 ऑक्टोबरला काळात देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. आज महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, देशातील अनेक भागातून मान्सूनने पूर्णपणे माघारी घेतली आहे.यामुळे तापमानात वाढ झाली आहे. मुंबईमध्येही तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Maharashtra Rain : राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज, कोकण,कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात यलो अलर्ट