Nashik Latest News : नाशिक शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून सर्वच भागांत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. वाहने कुठून चालवावीत असा सध्या प्रश्न सध्या नागरिकांना पडत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मानसेनेने शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांसंदर्भात पुष्पगुच्छ आंदोलन केले आहे. नाशिक शहरातील जवळपास सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. अनेक भागात खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहेत. तर अनेक भागात पावसामुळे साथीचे रोग देखील पसरले आहे. अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले असताना महापालिका प्रशासन तात्पुरते खड्डे बुजवून नागरिकांना वेठीस धरीत आहेत.
दरम्यान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत थेट महापालिका गाठत आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्त बाहेर असल्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारण्यात आला. यामुळे सुरक्षा यंत्रणाची धावपळ उडाली होती.
दरम्यान मनसैनिकांनी महापालिकेच्या समोरील रस्त्यांच्या खड्ड्यांवर पुष्पगुच्छ करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच साथीचे आजार आणि डेगु, स्वाइन फ्लू या आजारावरून मनसेना आक्रमक झाली. अतिरिक्त आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घोषणा देत अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांचा घेराव करण्यात आला. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था बाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कंत्राटदारांवर कारवाईची मागणी
पहिल्याच पावसात शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या झालेल्या प्रचंड दुरावस्थे मुळे नाशिककर नागरिक, व्यावसायिक , प्रवाशी सर्वांना प्रचंड मनःस्तापाला सामोरे जावे लागत असून शहरातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करून रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संबंधीत कंत्राटदारास दोषी धरून त्यास कायम स्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी यावेळी मनसेनेकडून करण्यात आली.
मनपाकडून रस्ते दुरुस्ती
पहिल्याच पावसात नाशिकच्या रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाकडून रस्ते दुरुस्ती ची कामे हाती घेण्यात आली आहेत. पेव्हर ब्लॉक, खडी आदींच्या साहाय्याने खड्डे बुजविण्यात येत आहेत. शहरातील विविध भागात ही कामे करण्यात येत असून तात्पुरती डागडुजी करण्यात यावी असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.