नाशिक : मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. कुणबी समाजाचं नाही तर इतर समाजासाठी झगडणारा नेता म्हणून पुढे आले आहेत. जे काही स्वतःचा त्याग करायचं जे सुरू आहे, ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर प्रक्रिया करून उपोषण कसं मागे होईल, यासाठी प्रयत्न करावा. मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही म्हणाल तिथं मी हजर राहील, मतदान तुम्ही केलं आहे, वेळ पडली तर राजीनामा सुद्धा देण्याची तयारी असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले. 


मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारकडून दिरंगाई होत असल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला धारेवर धरत मराठा समाज एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अनेक आमदार, खासदारांकडून राजीनामे दिले जात आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी देखील मनोज जरंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना देखील मराठा समाज बांधवानी घेराव घातला. यावेळी त्यांनी माझा मराठा समाज बांधवाच्या आरक्षण मागणीला पूर्ण पाठिंबा असून मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही म्हणाल तिथं मी हजर राहील, मतदान तुम्ही केलं आहे, वेळ पडली तर राजीनामा सुद्धा देण्याची तयारी असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले. 


नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या 50-55 दिवसापासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू केले. मराठा समाज पूर्वीपासून शेतीकरत आला आहे. काही लोकांच्या कुणबी म्हणून नोंदी लागल्या आहेत, तर काहींच्या नोंदी लागलेल्या नाहीत. मात्र आजही ते शेती करत आहेत. अशा लोकांची जी काही जास्त मागणी आहे, त्या मागणीला मी दिंडोरी तालुक्याचा प्रतिनिधी मनापासून पाठिंबा देतो. यापूर्वी सुद्धा एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले, त्यावेळी आम्ही सोबत होतो. आजही मी तुमच्याबरोबर असून तुम्ही तुमच्या पद्धतीने आदेश द्याल, त्या पद्धतीने तुमच्या सोबत असल्याचे देखी नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. आरक्षण देताना कुठल्याही आरक्षणाला जे पूर्वीच आरक्षण आहे, त्याला कोणालाही धक्का न लावता, जी काही रास्त मागणी आहे, त्या मागणीनुसार शासनाने गंभीरपणे विचारपूर्वक आरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राज्यात असंतोष आहे, त्यामुळे हा माहोल रोखण्यासाठी शासनाने ठोस उत्तर दिले पाहिजे. यात कायदेशीर बाबी जरी असतील, परंतु कायदेशीर बाबींवर काम करून निर्णय घेणं अपेक्षित आहे. 


आमदार सुहास कांदे म्हणाले .... 


तर एका कार्यक्रमात आमदार सुहास कांदे म्हणाले की, माझा सुरवातीपासून मराठा आरक्षणाला पाठिंबा असून वेळ पडली तर राजीनामा सुद्धा देईन. जोपर्यत मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सुटत नाही, जोपर्यंत मराठा आरक्षणावर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मी कुठल्याही गावात जाणार नाही, कुठल्याही विकासकामांच उदघाटन करणार नाही, असा प्रण यावेळी सुहास कांदे यांनी घेतला. 


इतर महत्वाची बातमी : 


दोन खासदार, तीन आमदारांचे राजीनामे, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी कोणी पद सोडलं?