नाशिक : कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदी व्यापारी आणि ग्राहक या सर्वांच्या हिताचाच शासन विचार करेल. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीतूनच अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना फोन केला. पियुष गोयल यांनी आजच संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला छगन भुजबळांसह विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते. शिवाय नाशिकचे जिल्हाधिकारी, नाफेडचे (NAFED) अधिकारी, लासलगाव बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे आदींसह व्यापारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करत मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच या बैठकीतून वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना फोन करत बैठकीचा सविस्तर आढावा देत कांदा प्रश्नावर निर्णय घेण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये बंद ठेवलेली कांदा खरेदी तात्काळ सुरू करावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मंत्रालयातील बैठकीवर कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी अद्याप भूमिका मांडलेली नाही. 


अजित पवार यावेळी म्हणाले की, देशांतर्गत कांद्याचे दर (Onion Rate) नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून केंद्र शासनाने 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन्ही यंत्रणांमार्फत अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करण्यात आली असून खरेदीची मुदतही 10 सप्टेंबरला संपली आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी (Onion Traders Strike) बंद पुकारल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी व्यवहार सुरू करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


आज सायंकाळी पियुष गोयल यांच्यासोबत बैठक  


कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करणार असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदी व्यापारी आणि ग्राहक या सर्वांच्या हिताचाच शासन विचार करेल. देशातील इतर राज्यांच्या बाजारांमध्ये नाफेडमार्फत कमी दरात कांदा विक्री होत असल्यामुळे राज्यातील कांदा व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आज सायंकाळी पियुष गोयल यांच्यासोबत पुन्हा बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीत नेमका काय सकारात्मक तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Onion : कांदा प्रश्न पेटला! मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत आज बैठक; वाचा नेमकं कोण काय म्हणालं?