Nashik Igatpuri Fire : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले असून केमिकल लिकेज होऊन आग लागल्याची संशय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यात आगीची (Nashik News) भीषण घटना समोर आली. बॉयलरचा भीषण स्फोट होऊन ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. त्यानंतर भीषण स्फोट होऊन आग लागली. या आगीत आतापर्यंत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून 17 कामगारांवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आगीचे कारण प्राथमिक कारण समोर आले असून केमिकल लिकेज होऊन आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान आगीची दाहकता एवढी होती की आकाशात प्रचंड प्रमाणात लोट उसळले होते. परिसरातील अनेक गावांना या स्फोटाचा हादराही बसला. त्याचबरोबर कसळूबाई या शिखरावरूनही या आगीचा धूर दिसत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला. अद्यापही ही आग भडकत असल्याने पंचनामा करण्यातही पोलीसांना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून कंपनीत तांत्रिक तपासणी केली जाऊन अधिक तपास केला जाणार, त्यानंतर आगीचे खरे कारण समोर येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या घटनेमुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत. आगीमुळे मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण आणि एकूण किती नुकसान झाले, याची माहिती हाती आलेली नाही. या ठिकाणी जवळपास शंभर फूट उंच आगीच्या ज्वाला, शेकडो फूट उंच हवेत काळा धुरच धूर दिसत आहे.
तर आगीची घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर स्थानिक स्तरावर घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली जाऊन पुढे सखोल तपास केला जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिंदाल कंपनीत लागलेली आग नेमकी कशामुळे लागली हे सखोल चौकशीनंतरच समोर येईल असे दिसते आहे.
तर काशिनाथ मेंगाळ म्हणाले..
काशिनाथ मेंगाळ हे स्थानिक माजी आमदार असून मुंढेगाव येथील रहिवासी आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंपनी प्रशासनाने चुकीची माहिती दिली असून कंपनीत एकूण सात हजार कामगार काम असतात. कंपनी व्यवस्थापन सांगत आहे की फक्त 1200 कर्मचारी काम करत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणी मेंगाळ यांनी केली आहे.
ही बातमी देखील वाचा