Nashik Igatpuri Fire : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत आतापर्यंत 19 स्फोट झाले आहेत. तर भीषण आगीमुळे आकाशात धुराचे लोट असल्याने  मुंबईहून दिल्लीकडे जाणारे विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीतील एका प्लँटमधे बॉयलरच्या स्फोटाने भयंकर आग लागली. या आगीत आतापर्यंत 19 कामगारांना रेस्क्यू करण्यात आले होते. यातील 4 कामगार गंभीर असताना यातील दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत व जखमींवर सर्व उपचार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. 

 

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील सर्वांत मोठा असणाऱ्या जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यातील एस एस पी 2 या प्लँटमधे सकाळी आठ ते अडीच वाजेच्या शिफ्टला जवळपास 100 कामगार उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बॉयलर हीट झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या प्लँटमधील 19 कामगारांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते पैकी दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या आगीचे रौद्ररूप इतके भयंकर होते की इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आकाशात आगीचे लोळ दिसत होते, अद्यापही दिसत आहेत. 

 

जिंदाल कंपनीतील आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले आहेत. मात्र मुंबई दिल्ली विमानसेवेचे मार्ग बदलले असल्याची माहिती अद्याप  अधिकृत नसल्याचे इगतपुरीचे तहसीलदार कासुळे यांनी सांगितले. 

 

दरम्यान या घटनेत मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच 3 वाजेनंतर पुन्हा येथील डिझेल टँकला आग लागल्याने गोंधळ उडाला होता. या घटनेत असंख्य कामगार जखमी, तर अनेक कामगारांचा जळून, गुदमरून मृत्यू झाला असल्याचे परिसरातील नागरिक म्हणणे आहे, मात्र प्रशासनाकडून आतापर्यंत 2 महिलांचा मृत्यू तर 17 जण जखमी असल्याचे माहिती मिळाली आहे. 

 

दरम्यान आग विझवण्यासाठी सकाळपासून इगतपुरी, निफाड, पिंपळगांव बसवंत आदी तालुक्यासह नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून अग्निशमन पथकाच्या 20 हुन अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच घटनास्थळी 25 रुग्णवाहीका बचावकार्य करत आहेत. त्याचबरोबर कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात येऊन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. 

   
  

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या घटनेमुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत. आगीमुळे मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण आणि एकूण किती नुकसान झाले, याची माहिती हाती आलेली नाही. या ठीकाणी जवळपास शंभर फूट उंच आगीच्या ज्वाला, शेकडो फूट उंच हवेत काळा धुरच धूर दिसत आहे.

तर काशिनाथ मेंगाळ म्हणाले..


काशिनाथ मेंगाळ हे स्थानिक माजी आमदार असून मुंढेगाव येथील रहिवासी आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंपनी प्रशासनाने चुकीची माहिती दिली असून कंपनीत एकूण सात हजार कामगार काम असतात. कंपनी व्यवस्थापन सांगत आहे की फक्त 1200 कर्मचारी काम करत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणी मेंगाळ यांनी केली आहे.

 

ही बातमी देखील वाचा