Nitin Wagh Passes Away : नाशिकचे प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक आणि गाढे अभ्यासक डॉ. नितीन भरत वाघ (48) (Nitin Wagh) यांचे सोमवारी सायंकाळी पणजी (Panaji) येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने(heart attack) निधन झाले. त्यांच्या निधनाने बुद्ध व आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा एक प्रतिभावान विचारवंत हरपल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.

डॉ. वाघ यांचे ‘हिंदू-मुगल सांस्कृतिक समन्वय, औरंगजेब, सन १८५७ नंतर भारताचे मुसलमान’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशनाच्या उंबरठ्यावर होते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्येष्ठ लेखक राजन गवस यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते सावंतवाडी येथे गेले होते. मात्र, तिथेच हॉटेलमध्ये त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

उपचार सुरु असतानाच प्राणज्योत मालवली

तत्काळ त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे हलवण्यात आले. रविवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना गोव्यातील पणजी येथे नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

साहित्य, समाज आणि विचारांची अनोखी त्रिसंधी

डॉ. वाघ यांनी काही वर्षांपूर्वी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ लेखनास वाहून घेतले होते. बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि नामदेव ढसाळ यांचे विचार व जीवनकार्य हा त्यांच्या अभ्यासाचा गाभा होता. ‘झेन’ आणि ‘निळावंती’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या, तसेच त्यांनी काही चित्रपट कथाही लिहिल्या होत्या. दीर्घ अभ्यासातून साकारलेले ‘हिंदू-मुगल सांस्कृतिक समन्वय’ हे त्यांचे महत्त्वाकांक्षी पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचण्याआधीच ते काळाच्या पडद्याआड गेले, ही खंत साहित्य रसिकांना सतावत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

मंगळवारी नाशिकमध्ये अंत्यसंस्कार

दरम्यान, डॉ. वाघ यांच्या निधनाने साहित्यविश्वात शोककळा पसरली असून, अनेक साहित्यिक व चाहत्यांनी सोशल मीडियावर शोकभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे पार्थिव नाशिकला आणले जात असून, मंगळवारी दुपारी पंचवटी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News : 'तो' पांढऱ्या थारमध्ये आला, 16 वर्षीय मुलीला कारमध्ये बसण्याचा आग्रह करू लागला; अन्.....; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं, इन्स्टाग्रामवर मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो शेअर केला, बदनामी झाल्यानं नाशिकमधील अल्पवयीन मुलीनं गळ्याला लावला दोर