Nashik: नाशिक शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व अलीकडच्या काळात प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या नंदिनी नदीची (Nandini River) सुटका करण्यासाठी अनोखा प्रयोग राबविण्यात येत आहे. नंदिनी कचरामुक्त व प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदी काठावर 26 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 


नाशिक (Nashik) शहरातून वाहणारी पूर्वीची नासर्डी नदी अलीकडे पर्यावरण प्रेमींच्या जनजागृतीमुळे नंदिनी झाली. मात्र आजूबाजूला असलेल्या वस्तीमुळे नेहमीच नदी प्रदूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी लढा दिला जात आहे.  नंदिनी नदीचे प्रदूषण रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत 10 ठिकाणी एकूण 26 कॅमेरे बसविण्याचे स्मार्ट सिटीने निश्चित केले आहे. याबाबतचे पत्र ठाकरे गट (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व सत्कार्य फाउंडेशनचे बाबासाहेब गायकवाड यांना प्राप्त झाले आहे. गायकवाड दाम्पत्याने गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 


नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकून प्रदूषण केले जाते. वाळू उपसाही मोठ्या प्रमाणात केला जातो. मद्यपी, गर्दुल्ले हे नदीपात्रात येऊन बसतात. येथे लपण्यासाठी गुन्हेगारही आश्रय घेतात. नंदिनीमुळे गोदावरीचेही प्रदूषण वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येते. प्रदूषण रोखण्यास मदत व्हावी, नदी व परिसरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटीकडे करण्यात आली होती. 


नाशिक मनपा आयुक्तांनी या विषयाला 16 मार्च 2022 ला मंजुरी देऊन त्याबाबतचे पत्र व नकाशे स्मार्ट सिटीला दिले होते. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या 23 व्या बैठकीत दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी या विषयाला मंजुरी देण्यात आली. याबाबतचे इतिवृत्तही मंजूर करण्यात आले. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. याबाबतचा स्थळ पाहणी तांत्रिक अहवाल स्मार्ट सिटीला कॉन्ट्रॅक्टरने दिला आहे.


...तर आंदोलन करण्याचा इशारा


प्रभागात शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनकडून विविध विकासकामे करण्यात आली. त्याचे फुकटचे श्रेय काहींनी लाटले. काही कामे मंजूर होऊ नये, त्यांची वर्कऑर्डर निघू नये, मंजूर काम सुरू होऊ नये, सुरू झालेले काम बंद करणे, असे उद्योग श्रेय न मिळाल्याने राजकीय आकसापोटी केले जात आहेत. नंदिनीचे हे काम थांबण्यासाठी संबंधित यंत्रणेवर दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पर्यावरणप्रेमी व प्रभागातील नागरिकांतर्फे आंदोलन करण्यात येईल  असा इशारा शिवसेना ठाकरे गट, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.