Nashik Crime : सिन्नरच्या माळेगाव (Malegaon) येथील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत एकाच ठिकाणी कामावर असलेल्या विधवा महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तीचा खून केल्यानंतर संशयिताने गोंदे येथे येऊन शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. प्रेम संबंधातून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे. शिल्पा अमोल पवार (28, रा. मापारवाडी) असे मयत महिलेचे नाव आहे. तर महेंद्र सखाहरी रणशेवरे (48, रा. गोंदे, ता. सिन्नर) असे आत्महत्या केलेल्या पुरुषाचे नाव आहे. (Nashik Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, शिल्पा अमोल पवार आणि महेंद्र सखाहरी रणशेवरे हे दोघेही माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील (Malegaon MIDC) हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामावर होते. सदर महिलेला 10 आणि 8 वर्षांची दोन मुले आहेत. तर रणशेवरे यांनाही एक मुलगा, मुलगी आहे. रविवारी दोघेही कंपनीत कामावर होते. सुरक्षारक्षक कॅबिनच्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागे निर्जनस्थळी हे दोघेही रविवारी सकाळी 9 वाजता सोबत जाताना सीसीटीव्हीत कैद झाले.
धारदार शस्त्राने वार करत महिलेची हत्या
या कॅबिनच्या पाठीमागच्या बाजूला सीसीटीव्ही नसल्याची संधी साधून रणशेवरे याने शिल्पा पवार हिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर कंपनीतून गेट पास न घेताच सुरक्षा भिंतीवरून उडी मारून तो घरी आला आणि गदि येथे त्याने श्रीघर रणशवरे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी कंपनीतील काही कामगार कामानिमित्त इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागे गेले असता तेथे महिलेचा मृतदेह पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. श्वानाने इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागून मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. त्यामुळे तेथून संशयित दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने फरार झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात मयत शिल्पा पवार हिचा दीर गुलाब पवार याने मुसळगाव एमआयडीसी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. तर महेंद्र रणशवरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सुभाष रणशेवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वावी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या