Nashik Water Crisis : नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील (Peth Taluka) बोरीची बारी (Borichi Bari) या गावात पाण्याची टंचाईची समस्या (Water scarcity) दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गावातील नागरिकांना फेब्रुवारीपासून पाणी विकत घ्यावं लागतंय आणि त्यासाठी त्यांना 200 लिटरच्या एका ड्रमसाठी तब्बल 60 रुपये मोजावे लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. 

दिवसाला मिळणाऱ्या साधारण 200 रुपयांच्या मजुरीतून 60 रुपये फक्त पाण्यासाठी खर्च होत असल्याने, उरलेल्या 140 रुपयांत येथील नागरिकांना घरखर्च भागवावा लागतोय. परिणामी, अनेक कुटुंब चटणी-भाकरीवर दिवस काढत असल्याचे चित्र आहे. एवढंच नव्हे तर त्या एका ड्रममधीलच पाणी घरातील सदस्य आणि जनावरांनाही द्यावं लागतंय, हे वास्तव अधिक गंभीर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे संकट सुरू असतानाही प्रशासनाचे लक्ष आता कुठे या गावाकडे वळले आहे. या गावात पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून काही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गावातील महिलांनी वेगळीच आणि अत्यंत वेदनादायी समस्या अधोरेखित केली आहे.

आमच्या मुलांचं आयुष्य पाण्यामुळे अडकलंय....

या गावातल्या महिलांनी सांगितलं की, पाण्याची टंचाई ही आता सामाजिक अडचण बनली आहे. गावातील अनेक तरुण मुलांचं लग्न फक्त पाणी प्रश्नामुळे रखडलं आहे. सोयरिक ठरताना मुलीच्या घरच्यांकडून गावात पाणी आहे की नाही याची माहिती घेतली जाते. मात्र, पाणी नसल्याचं कळल्यावर अनेक वेळा नकार दिला जातो, आणि लग्न मोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पिढ्यानपिढ्या आम्ही पाण्यासाठी वणवण करत आलोय. आता आमच्या मुलांचं आयुष्य पाण्यामुळे अडकलंय. हे किती दिवस चालणार? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केलाय.  

नागरिकांना करावा लागतोय अनेक अडचणींचा सामना 

दरम्यान, दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या मजुरीतून एक चतुर्थांश रक्कम फक्त पाण्यासाठी खर्च होत आहे. म्हणजेच येथील नागरिकांना दिवसाला साधारणपणे 200 रुपये मजुरीचे पैसे मिळतात, त्यात 60 रुपये पाण्यासाठी मोजावे लागत असल्याने 140 रुपयात घर खर्च चालवावे लागत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता प्रशासनाने या गावात पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असली तरी येथील पाणी प्रश्न कधी मिटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हंडाभर गढूळ पाण्यासाठी 'लाडक्या बहिणी'ची वणवण; कुठंय मिशन 'जल'जीवन? पाहा फोटो

Marathwada News : मराठवाड्यात तीन महिन्यात 269 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, बीडची आकडेवारी चिंताजनक, शासन काय उपाययोजना राबवणार?