Nashik Crime : नाशिकमधील सिडको येथे पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेध करण्यासाठी 'हिंदू विराट' सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (lawrence bishnoi) याचा बॅनर झळकल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेत या प्रकारावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा बॅनर झळकवल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला होता. तसेच, पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ नाशिकमधील सिडको येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पडळकर यांनी देशातील हिंदू समाजाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत व्यक्त केले. मात्र, या सभेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी लॉरेन्स बिश्नोईचे  फोटो झळकवल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील एका राजकीय नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा तसेच विविध अभिनेते आणि उद्योजकांना खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप असलेल्या लॉरेन्स बिश्नोईविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी विचारले असता "आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी यावर चर्चा झाली असून, त्यांनी पोलिसांना संबंधित माहिती द्यावी, असे मी सांगितले आहे. या प्रकारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडाचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. ज्यांनी हे फलक झळकवले आहेत, त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल," असे आश्वासन दिले होते. 

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर नाशिकमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सभेदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा बॅनर झळकवल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या सभेदरम्यान अल्पवयीन मुलाकडून लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर झळकवण्यात आला होता. आता या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोटो दाखवून दहशत पसरवण्याच्या कारणाने नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आणखी वाचा 

Gopichand Padalkar: ज्याच्या डोक्यावर टिळा त्यांच्याकडूनच खरेदी करा, हलालचा पैसा हिंदूविरोधी कारवायांसाठी वापरला जातो: गोपीचंद पडळकर