Rohit pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik Court) 9 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी रोहित पवार यांनी बदनामी केल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केलाय. त्यामुळे येत्या 9 डिसेंबरला रोहित पवार यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

Continues below advertisement

हे प्रकरण पावसाळी अधिवेशनादरम्यान उसळले होते. विधान परिषदेत तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यमान क्रीडामंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे सभागृहातील कामकाज सुरू असताना मोबाईलवर ‘ऑनलाइन रमी’ हा जुगार खेळत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली होती. त्या व्हिडीओमध्ये माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा दावा करण्यात आला होता. रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर राज्यभर मोठी राजकीय खळबळ उडाली होती.

Rohit Pawar: रोहित पवारांविरोधात बदनामीचा दावा

या व्हिडीओच्या तडाख्यात माणिकराव कोकाटे यांच्यावर सडकून टीका झाली. परिणामी, माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात देखील बदल करण्यात आला. तर, हा व्हिडीओ “खोटा आणि दिशाभूल करणारा” असल्याचा आरोप करत माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वीच पोलिसांना दिले होते.

Continues below advertisement

Rohit pawar: 9 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

आता न्यायालयाने थेट आमदार रोहित पवार यांना न्यायालयात उपस्थित राहून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. रोहित पवार यांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. आता 9 डिसेंबरला न्यायालयात दोन्ही बाजूंकडून काय दावे–प्रतिदावे येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manikrao Kokate: मला कृषी खात्याचे मंत्रिपद गमवावे लागले, कोकाटेंचा युक्तिवाद

दरम्यान, याआधी झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात जबाब मांडताना म्हटले होते की, माझ्या मोबाईलवर 'जंगली रमी' ची जाहिरात आली होती, ती बंद करताना 15 ते 20 मिनिटे लागली. त्याच दरम्यानचा व्हिडिओ काढून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. मी विधान परिषदेमध्ये स्पष्ट स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही रोहित पवार यांनी ट्विट करत बदनामी केली. या प्रकारामुळे मला कृषी खात्याचे मंत्रिपद गमवावे लागले, पक्ष आणि वैयक्तिक प्रतिमेला मोठा धक्का बसला. व्हिडिओ कोणी आणि कसा काढला, याची चौकशी व्हावी. कारण, रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नाहीत, तरीही त्यांच्याकडे व्हिडिओ कसा पोहोचला, हे महत्त्वाचे आहे, असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला होता. 

आणखी वाचा

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: मोठी बातमी: सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पोलीस दिसताच 34 फुटांवरून उडी मारली अन्...