Nashik Accident : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर येथून दर्शन घेऊन परतत असतांना पिनाकेश्वर घाटात भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 भाविक जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करत भाविकांना बाहेर काढले. दरम्यान, दुसरीकडे लातूरमध्येही तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून लातूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. अपघातातील मृत व जखमी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जाणेफळ व खामगाव येथील रहिवासी होते.
महावितरणचे दुर्लक्ष; तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून लातूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा मृत्यू
लातूर तालुक्यातील हंचनाळ येथील शेतकरी अशोक भानुदास बिरादार (वय 48 ) यांचा रविवारी दुपारी शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागात हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले, तर काही ठिकाणी विद्युत तारा जमिनीवर पडल्या होत्या . तरीदेखील महावितरणने अशा ठिकाणी वेळीच वीजपुरवठा बंद केला नाही, अशी गंभीर चूक झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी दुपारी अशोक बिरादार हे शेतात गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरच्यांनी शेताकडे धाव घेतली असता, तेथे त्यांच्या हातात विद्युत तार अडकलेली दिसली. ते बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. तातडीने त्यांना अंबुलगा बु येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी बिरादार यांचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडली असूनही, त्या भागात वीजपुरवठा खंडित केला गेला नव्हता. "हे थेट दुर्लक्ष असून, याची जबाबदारी महावितरणचीच आहे," असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला. अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे निर्दोष शेतकऱ्याचा जीव गेला असून, मयतच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
चंद्रपुरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू; भंडाऱ्यात दुचाकीच्या अपघातात मुलगा ठार, वडिल गंभीर