नाशिक : बहुप्रतिक्षित वाघनखं (Waghnakh) लंडनच्या व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयातून अखेर महाराष्ट्रात पोहोचली आहेत. साताऱ्यात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) नाहीत,असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी केला आहे. त्यामुळे विरोधकांनी वाघनखांवरून राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार टीकास्त्र डागले आहे. आता वाघनखांच्या मुद्द्यावरून मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.    


लंडनहून आणली जाणारी वाघनखं  ही शिवरायांची नाहीत, असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पुष्टीही दिली माहिती इंद्रजित सावंत यांनी दिली होती. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही, असं पत्र या म्युझियमनं पाठवल्याचे त्यांनी म्हटले होते. यावरून सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 


वाघनखांचे राजकारण होते हे देशाचे, महाराष्ट्राचे दुर्दैव


वाघनखांचे राजकारण होते हे आपल्या देशाचे विशेषतः महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे. वाघनखांबद्दल शंका घेणारे प्रश्न आपण का उपस्थित करतोय? टिपू सुलतानच्या तलवारीबद्दल कधी प्रश्न उपस्थित केले का? असा सवाल मनसे नेते तथा प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केला आहे. लंडनच्या म्युझियममधून केवळ तीन वर्षांसाठी ती आपल्याला मिळाली आहे याचे महत्व लक्षात घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.


विशाळगडावरील अतिक्रमण काढलेच पाहिजे


विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्द्यावरून प्रकाश महाजन म्हणाले की, हा आजचा विषय नाही, अतिक्रमण काढले पाहिजे ही भूमिका सगळ्यांची होती. सरकारने ते काढायला घेतले तर त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पण अतिक्रमण करून त्यांनी घर बांधले हा मुद्दा कोणी विचारात घेत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक गडकोटावर अतिक्रमण होतेच कसे? याला स्थानिक प्रशासनच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. राजकीय नेते मतांसाठी लांगुलचालणं करतात. जे अतिक्रमण करताहेत त्यांचे डोळे पुसायला छत्रपती शाहू महाराज, अजित पवार जातात. मात्र, त्याच रस्त्यावर असलेल्या बाजीप्रभू यांची समाधी आहे तिथे कोणी गेले नाही, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil : वाघनखं भारतात आणून राज्य सरकारने चांगलं काम केलं; मनोज जरांगे यांनी केलं सरकारचं कौतुक, म्हणाले...