Nashik SSC Exam : यंदाच्या दहावी बारावी परीक्षेत गोपनीयता राखण्यासाठी तसेच गैरमार्गरहित परीक्षा पार पडण्यासाठी मंडळाने यंदा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये रनर लोकेशनची (Runner Location) माहिती मिळावी, तसेच प्रश्नप्रत्रिका सीलबंद आहेत, याची खात्री पटावी म्हणून व्हिडिओ अपलोड करण्याचे बंधन असणार आहे. यंदाच्या दहावी बारावी परीक्षेसाठी कठोर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये इयत्ता 12 वीच्या 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 व इयत्ता 10 वीच्या  (10 th Exam) 2 मार्च ते 25 मार्च, 2023 या कालावधीत लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्‍या परीक्षांचे संचलन सुयोग्य प्रकारे होवून त्या परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.


नाशिक जिल्ह्यात इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी (12th Exam) जिल्ह्यातील 108 केंद्रांवर 74 हजार 932 तर इयत्ता दहावी च्या 203 केंद्रांवर 91 हजार 669 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या लेखी परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपीविरहीत पार पडण्याकरिता शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर विभागांकडून संनियंत्रण करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची अतिसंवेदनशील, संवेदनशील, उपद्रवी व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात आली असून कॉपीचे प्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त व पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी हे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर आकस्मितपणे भेटी देणार आहेत.


परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक म्हणून एकाच शाळेचे अथवा संस्थेचे सर्व शिक्षक त्याच परीक्षा केंद्रावर न नेमता, मूळ शाळेचे काही शिक्षक व इतर शाळांचे काही शिक्षक अशा पद्धतीने पर्यवेक्षक नेमण्यात यावेत. तसेच परीक्षेला आल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. परीक्षेचे गोपनीय साहित्य नेणाऱ्या कर्मचाऱ्याचे लाईव्ह व जीपीएस लोकेशन घेतले जाणार असून परीक्षा कामी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीही अनधिकृत व्यक्ती परीक्षा केंद्रांवर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच विद्यार्थी कॉपी करतांना आढळल्यास विद्यार्थ्यावर व या गैरप्रकारात सहभागी व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले आहे.


दहावीच्या परीक्षेला नवीन काय? 


यंदाच्या दहावी बारावी परीक्षेत गोपनीयता राखण्यासाठी तसेच गैरमार्गरहित परीक्षा पार पडण्यासाठी मंडळाने यंदा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये रनर लोकेशनची माहिती मिळावी, तसेच प्रश्नप्रत्रिका सीलबंद आहेत, याची खात्री पटावी म्हणून व्हिडिओ अपलोड करण्याचे बंधन असणार आहे. महत्वाचे म्हणजे कोविड प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना दोन वर्ष परीक्षा दरम्यान देण्यात आलेल्या सवलती यंदा मिळणार नाहीत. परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या  जाणार आहेत. तसेच पेपरसाठी देण्यात आलेला अतिरिक्त वेळ यंदा मिळणार नसून परीक्षा तीन तासांमध्येच होणार आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचा धोका टाळण्यासाठी यंदा परीक्षा पूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार नाहीत तर वेळेवर मिळतील. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हास्तरावर चार भरारी पथके तर मंडळाची दोन भरारी पथके असणार आहेत. रनरद्वारे परीक्षा केंद्रावरील व्हिडिओ मंडळामार्फत दिलेल्या लिंकवर वेळोवेळी व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. 


विद्यार्थ्यांना आवाहन 


विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मंडळाणे समुपदेशक नियुक्त केले असून त्यांची यादी शाळांकडे देण्यात आली होती विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी संपर्क करण्याची सर्वांनाच मुभा आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी दर पंधरा दिवसांनी वर्गात जाऊन या विद्यार्थ्यांची संवादाद्वारे समुपदेशन उपक्रमही यंदा राबवण्यात आला. शिक्षण मंडळाने या संदर्भात संपर्क क्रमांक जारी केले असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राप्त करून घेता येईल. यासाठी नाशिक जिल्ह्यातील काही समुपदेशकांचे नंबर जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी या समुपदेशकांची संपर्क साधून आपल्या समस्या किंवा तक्रारी मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI