Nashik News : सध्या राज्यात सगळीकडे भीषण पाणीटंचाई (Water Crisis) जाणवत असून माणसांबरोबर पशु प्राण्यांना देखील या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. मात्र विहिरी आटल्या असल्या तरी माणुसकीचा झरा अजूनही वाहतो आहे, अशा आशयाचे चित्र नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाहायला मिळाले आहे. 


नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील (Yeola Taluka) रेंडाळे येथील सुखद प्रसंग पाहायला मिळतो आहे. येथील शेतकरी प्रवीण आहेर (Pravin Aher) यांच्या शेतात चक्क हरणं आणि मोरांनी गर्दी केली आहे. कशासाठी तर तहान भागविण्यासाठी. शेतकरी आहेर यांनी आपल्या शेतात सिमेंटची पाण्याची टाकी बांधली आहे. त्यामुळे तहानलेले हरीण मोर अगदी बिनधास्त येऊन तहान भागवीत आहेत. 


असं म्हणतात कि रानच्या पाखराला जीव लावला तर तेही जवळ येते. ही म्हण शेतकरी आहेर यांनी खरी करून दाखवली आहे. शेतकऱ्याच्या या माणूसपणामुळे या प्राण्यांसोबत मैत्रीचं नात तयार झालं असून अनोख्या मैत्रीची चर्चा तालुक्यासह परिसरात होत आहे. प्रवीण आहेर यांचं रेंडाळे येथे शेत आहे. आहेर हे स्वतः एक पक्षीप्रेमी देखील आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने विहिरी पाणवठे आटले आहेत. परिणामी पशु पक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. 


राज्यात दुष्काळाची अवस्था असताना पशु-पक्षांना पाणी आणि खाद्य पुरवण्यासाठी आहेर यांनी तरतूद केली आहे. भीषण पाणीटंचाईमुळे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. त्याचबरोबर उन्हाळ्यामुळे पाणवठे पूर्णपणे कोरडे पडले आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे मुक्या पशु-पक्षांना आपला जीव गमवावा लागत आहे. दरम्यान रेंडाळे हद्दीलगत वनक्षेत्र असुन अनेक वन्यजीव उन्हाळ्यात अन्न व पाण्याच्या शोधार्थ येतात, त्यांची तहान भागविण्यासाठी हि टाकी आहेर यांनी बांधली आहे. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना प्रवीण आहेर हे आदर्श उदाहरण ठरले आहे


आहेर हे वन्यप्रेमी 
प्रवीण आहेर यांचं शेत वनक्षेत्राला लागून असल्यामुळे अनेक पशु-पक्षी पाणी पिण्यासाठी किंवा खाद्यासाठी शेतात येतात. जंगलामध्ये पाणवठे पूर्णपणे सुकल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रवीण यांनी धडपड सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी शेतामध्ये सिमेंटचा हौद बांधला आहे. या हौद्यातले पाणी पिण्यासाठी दररोज हरीण, काळवीट, मोर पाणी पिण्यासाठी येतात. 


मोरांसाठी गाव प्रसिद्ध 
रेंडाळे या गावासह परिसरातील इतर गावे मोरासाठी म्हणून ओळखली जातात. त्यामुळे या गावांना पर्यटनासाठीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तसेच हरीण, काळविटांचा अधिवास आहे. या सर्व मोरांना येथील शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची भीती नसल्याने शेतात सुद्धा मोरांचे थवे मनसोक्त फिरताना दिसतात.