Nashik News : श्रावण महिन्यातील (Shravan Mahina) सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 21 ऑगस्टपर्यंत शस्त्रबंदीसह जमावबंदीचे (Prohibition) आदेश लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) भागवत डोईफोडे यांनी याबाबतचे आदेश काढले असून यामुळे आता पुढील दहा दिवस पाचहून अधिक जणांना एकत्र येण्यास मज्जाव असणार आहे. 


श्रावण महिना म्हटलं कि या महिन्यात अनेक सण- उत्सव साजरे केले जातात. या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश लागू करावेत अशी विनंती पोलिस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. या विनंतीला अनुसरून डोईफोडे यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, बंदूक, सुरे, दांडके किंवा दुखापत करण्यासाठी वापरात येतील, अशा प्राणघातक वस्तू बाळगण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणताही दाहक अथवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी सोबत नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे बाळगणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन किंवा दहन करणे, समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा करणे, शांतता धोक्यातील आणतील अशी भाषणे करण्यास या आदेशानुसार बंदी असणार आहे.


मुंबई पोलिस कायदा कलम 37(3) अन्वये संबंधित तालुका कायर्कारी दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता पाच किंवा त्याहून अधिक नागरिकांना मिरवणूक, मोर्चा, सभेसाठी एकत्रित करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे निर्बंध विवाह सोहळा, धार्मिक कार्य, आठवडे बाजार तसेच अंत्ययात्रेसाठी लागू राहणार नाही, असे डोईफोडे यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून नाशिकमध्ये देखील स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा हाेत असताना व श्रावण महिन्यातील अनेक धार्मिक सण-उत्सव लक्षात घेता अपर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द वगळून नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश 21 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात लागू राहणार आहे.


ग्रामीण भागातही अंमलबजावणी 
नाशिक शहराजवळील ओझर, गिरणारे, त्र्यंबकेश्वर या भागातही संबंधित आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कालावधीत कुठल्याही प्रकारच्या मोर्चा, आंदोलन, प्रतीकात्मक सभा अथवा राजकीय पक्ष, संघटनांच्या कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस अधिनियमाच्या 1951 अन्वये या कालावधीत कोणत्याही कार्यक्रम अथवा सामाजिक समारंभ करण्याचे नियाेजित असल्यास त्यास तालुका दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.