Nashik News : नाशिकजवळील (Nashik) पिंपळगाव टोलनाका (Pimpalgaon Toll Plaza) पुन्हा एकदा चर्चेत आला असून या टोलनाक्यावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे पिंपळगाव टोलनाका मात्र हाणामारीसाठीच प्रसिद्ध झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या परंतु अलीकडच्या काळात वाद विवादासाठी ओळखला जाणारा पिंपळगाव टोलनाका (Pimpalgaon Toll plaza) चर्चेत आला आहे. येथून कारने जाणारी एक महिला आणि टोलनाका महिला कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र थोडयाच वेळात या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. परिस्थिती अशी झाली की एकमेकांना भिडणाऱ्या महिला कुणालाही न जुमानता केस पकडून भांडत राहिल्या.


दरम्यान बघ्यांची गर्दी जमल्यानंतर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र या दोघींनी एकमेकींचे केस इतके घट्ट पकडून ठेवले होते की दोघींनाही आवरता येत नव्हते. शेवटी दोघा तिघांनी मिळून या महिलांचा बाजूला केले. मात्र तदनंतर देखील एकमेकांना शिव्या देण्याचे काम या महिला करत असल्याचे दिसून आले. दरम्यान या तुफान राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 



पिंपळगाव टोलनाका चर्चेत
विशेष म्हणजे पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर हुज्जत घालण्याचे प्रकार नित्याचे असून काही दिवसांपूर्वी टोल कर्मचाऱ्याने एका दैनिकाच्या उपसंपादकाला बातमी दिली म्हणून दमबाजी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही आठवड्यापूर्वी चक्क पोलीस अधीक्षकांची गाडी अडवून त्यांच्यासोबत दांडगाईचा प्रकार घडला होता. युनिफॉर्म असताना आणि शासकीय गाडी असताना देखील टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याची घटना घडली होती. या माध्यमातून टोल नाक्यावर सिक्युरिटी ठेवण्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 


टोलनाका वादाच्या भोवऱ्यात 
दरम्यान पिंपळगाव बसवंत टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी देखील अनेक घटना या टोलनाक्यावर घडल्या आहेत. त्यामुळे टोल वसुली करणाऱ्यांनी मुद्दामहून भाईगिरीची भाषा करणारे कर्मचारी नेमलेत कि काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. आमदार असो, खासदार, महिला असो कि पुरुष सगळ्यांनाच येथील कर्मचाऱ्यांचा अरेरावीची प्रत्यय आला आहे. आता थेट पोलीस अधीक्षकांनाच दांडगाई दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर सामान्य नागरिकांना हा नित्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.