Nashik News : एकीकडे नाशिक शहरात गुन्ह्यांची मालिका सुरूच असतांना अशा परिस्थितीत काही नाशिक पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शहरातील एका व्यक्तीची पैशाने भरलेली हरवलेली बॅग अवघ्या तासाभरात नाशिक पोलिसांनी शोधून काढली आहे. 


नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे पोलीस कोम्बिंग ऑपरेशन सह गुन्हेगारांवर वाचक आणण्यासाठी धडक कारवाया सुरु आहेत. मात्र गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. त्यातच सरकारवाडा पोलिसांनी एका प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अवघ्या तासाभरात पोलिसांनी थोडे थोडके नाही तर जवळपास सहा लाख 68 हजारची रक्कम तक्रारदारास मिळवून दिली आहे. एवढी मोठी रक्कम हरविल्याने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात तपास चक्रे फिरवून तक्रारदार यांना परत केले आहे. 


नाशिक येथील चार्टर्ड अकाउंटंट असलेले उल्हास भोसले आणि जयेश देसले यांच्या ऑफिसमधील सहाय्यक गणेशचंद्र पिंगळे यांना ऑफिसमध्ये जमा झालेली रोख रक्कम सीबीएस येथील जळगाव जनता बँकेत भरण्यासाठी सांगण्यात आले होते. त्याआधी ते रामायण बंगल्यासमोर चार्टर्ड अकाउंटंट तुषार पगार यांच्या ऑफिसमधून चेक घेण्यासाठी थांबले होते. तुषार पगार यांच्या ऑफिसमधून चेक घेऊन गणेश चंद्र पिंगळे यांनी रोख रक्कम असलेल्या बॅगमध्ये ठेवला. मात्र ते घाईगडबडीत बॅगची चैन लावण्याची विसरून गेले. 


दरम्यान अनावधानाने झालेल्या चुकीमुळे गणेश चंद्र दुचाकीवरुन जात असताना त्यांनी बॅगेत ठेवलेली तब्बल सहा लाख 68 हजाराची रक्कम खाली पडली. ही बाब लक्षात येताच सगळ्यांनी पैसे असलेल्या पिशवीचा बराच शोध घेतला. मात्र खूप वेळ शोधूनही ही पिशवी न सापडल्याने पिंगळे यांनी तात्काळ सरकारवाडा पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी सरकार वाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर साजन सोनवणे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक कार्यान्वित करत तपासाची चक्रे फिरवली. 


नाशिक पोलिसांनी गणेशचंद्र पिंगळे हे कामानिमित्त ज्या मार्गावरून मोटरसायकल फिरवली. त्या मार्गावर शोध सुरू केला. पोलिसांनी या मार्गावरील परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही तपासले. त्याच दरम्यान सिटीमध्ये ही लाल रंगाची रामायण बंगल्यासमोर पडलेली असल्याचे आणि एक व्यक्ती ती घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या व्यक्तीची माहिती घेऊन त्याचा शोध घेत चौकशी केली असता तपासात ही व्यक्ती अश्विन कुमार आगळे असल्याचे समोर आले. आगळे यांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधत, पोलीस स्टेशनमध्ये बोलवले. त्यानंतर त्या व्यक्तीने सर्व रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केली. सरकारवाडा पोलिसांनी अवघ्या तासाभरात या घटनेचा छडा लावल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


मोठ्या गुन्ह्यांत अशी तत्परता कधी? 
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खुन, अपहरण, प्राणघातक हल्ल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र यातील काही घटनांमधील गुन्हेगार आजही फरार आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांनी तातडीने या महत्वाच्या घटनांकडे लक्ष केंद्रित करते आवश्यक असल्याचे दिसून येते. दरम्यान सदर घटनेमध्ये नाशिक पोलिसांनी ज्या तत्परतेने तपासाची चक्रे फिरवली त्याच गतीने इतरही घटनांत लक्ष घालून नाशिकरांना सुरक्षितता देणं गरजेचे आहे.