Nashik News : काही महिन्यांपूर्वी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड (Manmad) शहराजवळ विजेच्या धक्क्याने (Electric Shock) अनेक मोरांचा (Peacock) मृत्यू झाला होता. आता पुन्हा याच परिसरात विजेच्या धक्क्याने एका मोराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोरांसह वन्यप्राण्यांच्या सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवारातील (Panewadi Indian Oil) इंडियन ऑइल कंपनीच्या गॅस प्रकल्पाजवळ राष्ट्रीय पक्ष असलेल्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.  सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मतमोज ताब्यात घेतले.


दरम्यान जून महिन्यात देखील या ठिकाणी तीन मोरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता त्याच परिसरात पानेवाडी येथील इंडियन ऑइल गॅस प्रकल्पात महावितरण 33 केवी या वीज प्रकल्पातून वाहत असलेल्या वीज प्रवाहाला मोराचा धक्का बसल्याने ते जागीच गतप्राण झाले.यावेळी मोठा आवाज होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता.


मनमाड शहरानजीक असलेल्या पानेवाडी परिसरात वन्यप्राण्यांना वावरण्यासाठी पुरेसा पाणीसाठा, वातावरण असल्याने येथे नेहमी वन्यप्राण्यांची वर्दळ असते. इंधन प्रकल्पात मोठ्याप्रमाणात पाणी लागत असल्याने परिसरात पाणी असल्याने मोरांचे वास्तव्य आहे. येथील गॅस प्रकल्पातील महावितरणच्या 33 केवी ट्रांसफार्मर 40 प्रवाहाचा धक्का बसून मोर मरण पावला. घटनास्थळी नांदगाव वनविभागाचे वनरक्षक सीडी कासार, सुनील महाले, एस एम बेडवाल यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करून मृत मोराचे शवविच्छेदन करून सदर घटनेची नोंद वनविभागाकडे केली.


यापूर्वीही अनेक घटना 
नांदगांव तालुक्यातील (Nanadgaon Taluka) आमोदे येथील शिवारात दहा मोर (Peacock) मृतावस्थेत आढळून आले होते. वन विभागाने दखल घेत विषबाधेमुळे या माेरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. तर जून महिन्यात विजेच्या धक्क्याने तीन मोरांचा मृत्यू झाला होता. सातत्याने होणाऱ्या मोराच्या मृत्यूमुळे हा चिंतेचा विषय ठरला आहे. शिवाय वन्यप्रेमींकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे. 


वन्यप्रेमींकडून संताप व्यक्त
दरम्यान मनमाड परिसरात मोरांचे वास्तव्य आहे. मात्र काही ना काही कारणास्तव मोरांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. वारंवार असे प्रकार घडताना पक्षांसह अन्य वन्यप्राण्यांचे नाहक जीव जात आहेत. वन्यप्रेमींकडून या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी वन्यप्रेमीसह नागरिकांनी केली आहे.