Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik)) लाचखोरीचे लोन काही केल्या शमत नसताना असता नाशिक महापालिकेमध्ये (Nashik NMC) हे लोन शिरल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिक महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडे (Workers) पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र दोन्ही कर्मचाऱ्यांना आता जेलची हवा खावी लागलाणार आहे. लाच स्विकारताना दोन्ही कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात लाचखोरीच्या (Bribe Case) घटनांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय जिल्ह्यातील अनेक भागातही लाचेच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्याला लाचखोरांनी अक्षरश पोखरून काढले आहे. अशातच आता हे लोन नाशिक मनपापर्यंत पोहचले आहे. नाशिक महानगर पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी पैसे कमविण्याचा नवा फंडा आखला होता. पण, त्या आधीच ते दोघेही लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकले आहे. 'पाच हजार रुपये दर महिन्याला द्या, कामावर न येता पूर्ण पगार घ्या' अशी योजनाच नाशिक महानगर पालिकेच्या दोन पालिका कर्मचाऱ्यांनी आखली होती. 


नाशिकच्या नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच हजार रुपयाची मागणी पालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याकडे करण्यात आली होती. त्याने ही तक्रार थेट एसीबीकडे केली होती. याची दखल एसीबीने घेत सापळा रचला होता. त्यात एसीबीच्या पथकाला यश आले असून स्वछता निरीक्षक राजू निरभवणे आणि मनपा कर्मचारी बाळू जाधव असे लाचखोर संशयितांची नावे आहेत. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत 'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक बनविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून हजारो सफाई कामगार शहरातला कचरा स्वच्छ करण्याचे काम करतात. मात्र याच सफाई कर्मचाऱ्याला लुबाडण्याचा गोरखधंदा नाशिक महानगर पालिकेतून उघडकीस आला आहे. 


पाच हजार रुपयांची मागणी 
नाशिक महापालिकेत हजारो सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. सकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत शहरातील सहा विभागांत हे कर्मचारी स्वच्छतेत तत्पर असतात. मात्र याच विभागातील दोघं कर्मचाऱ्यांनी 'पाच हजार रुपये दर महिन्याला द्या, कामावर न येता पूर्ण पगार घ्या अशी योजना राबवत महापालिकेत लाचखोरीला खतपाणी घातल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून इतरही विभागात अशी योजना कार्यान्वित नसेल कशावरून? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. नाशिक महानगर पालिकेतील अधिकारी हे मर्जीतील कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावत नसतांना त्यांना पगार चालू असतो अशी ओरड अनेकजण करायचे मात्र या कारवाईने आता अशी लाचखोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.