Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठमध्ये (Peth Taluka) व्यवस्थेच्या गलथान कारभाराची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेठ नगरपंचायतीच्या (Peth Nagarpanchayat) उघड्या गटारात पडून एका एसटी कर्मचाऱ्याचा (ST Worker) मृत्यू झाला आहे.
एकीकडे नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा (Surgana), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरूच असून अशातच पावसामुळे उघड्या गटारांची समस्या जैसे थे पाहायला मिळते आहे. या उघड्या गटारांनी पेठ शहरात एका एसटी चालकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पेठ शहरातील नगर पंचायती समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील तुंबलेल्या नालीत पाय घसरून पडल्याने पेठ आगारातील कंडक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पेठ शहरातील जुना बसस्टॅण्ड व पंचायत समिती समोरील चौकात नगर पंचायतीच्या शॉपींग कॉम्प्लेक्स समोर तुंबलेल्या गटारीत पेठ आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत असणारे यशवंत जिवला लहारे (50) वर्ष हे पाय घसरून पडले.
दरम्यान लहारे हे गटारात पडल्यानंतर ते बराच वेळ पडून होते. मदतीसाठी अनेकदा याचना करूनही आसपास करूनही त्यांना मदत मिळाली नाही. अखेर हा प्रकार परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांना नालीतून बाहेर काढले. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी लहारे यांना तपासून त्यांना मृत घोषित केले.
लहारे हे मुळचे कळमुस्ते येथील रहिवासी होते. मात्र सध्या पेठ आगारात कार्यरत असल्याने ते सध्या शहरातच वास्तव्यास होते. मात्र लहारे यांच्या मृत्यूने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोनि दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार करीत आहेत.