Nashik Crime : गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये हत्यारबंद गुन्हेगारांना पेव फुटले आहे. आता पुन्हा तब्बल 07 तलवारी जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आधीच नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर या कारवाईचे महत्व वाढले आहे.
नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 चे अंमलदार रात्री पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार काझी गढी परिसरातील संशयित विपुल मोरे, गणेश वाकलकर, चेतन गंगवानी यांनी धारदार तलवारी घरात लपून ठेवल्या होत्या. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तपासचक्र फिरवत तीनही संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून एकूण 07 तलवारी जप्त करण्यात आल्या आहे.
पोलीस अंमलदार विशाल देवरे हे गस्तीवर असताना त्यांना अमरधाम रोडवरील काझीची कढी येथील युवकाकडे तलवारी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पथक तयार करीत सदर ठिकाणी भेट दिली. यावेळी विपुल मोरे यास बेकायदेशीर रित्या आणलेल्या तलवारी बाबत विचारपूस केली असता विपुल याने मित्रांसमवेत उज्जैन येथून 07 तलवारी आणल्याचे कबुल केले. पैकी 04 तलवारी विपुल यांच्या घरात तर 01 तलवार चेतन गंगावाणी, 02 तलवारी गणेश वाकलकर या संशयितांकडे असल्याचे सांगितले.
नाशिक शहरामध्ये मनाई आदेश जारी असतांना बेकायदेशीर रित्या तलवारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने त्या तलवारी जप्त करत संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांचा गुन्हे पूर्व इतिहास नसून छंद म्हणून घरात शोभेसाठी या तलवारी विकत आणल्या असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, भद्रकाली पोलिसांनी या संशयित आरोपींकडून सात तलवारी जप्त केल्या असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
नागरीकांना आवाहन
बेकायदेशीर रित्या धारदार तलवारी प्राणघातक शस्त्र बाळगणे हा कायदयाने गुन्हा असून शहरात नागरीकांनी अशा प्रकारे बेकायदेशीर रित्या तलवारी आणलेल्या असतील तर त्यांनी त्या तलवारी स्वत:हुन संबंधीत पोलीस स्टेशन येथे जमा कराव्यात. तसेच कोणीही नागरीकांने आपला वाढदिक्स किंवा इतर कोणताही कार्यक्रम साजरा करतांना प्राणघातक शस्त्रांचा वापर करू नये. असे कृत्य केल्यास पोलीस कायदेशिर कारवाई करतील, असे आवाहन करण्यात आले आहे.