Nashik News : कुणाचाही बड्डे असला कि चौकात, गल्लीत, मोठ्या बेटावर बॅनर लावायची फॅशन झाली आहे. बड्डे बॉयला शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळी मोठ्या फेल्क्समध्ये शुभेच्छा देतात. काहीवेळा तर स्वतः भाऊच पैसे खर्चून बॅनरबाजी करत असतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून अशा भाऊ, दादांना चाप लावण्यात नाशिक (Nashik NMC) मनपाला यश आले आहे. असे बॅनर आढळून आल्यास थेट कारवाई करण्यात येत आहे. 


नाशिक (Nashik) शहराला विद्रूप करणारे अनधिकृत होर्डिंग (Hoardings), तसेच फलक काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून अनधिकृत होर्डिंगबाबत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम जोरात सुरू आहे, अनधिकृत होर्डिंग आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासोबत होर्डिंग्जवर अधिकृत परवानगीसाठी क्यूआर कोड बंधनकारक केल्याने अनधिकृत होर्डिंग्जला चाप बसणार असल्याचा दावा विविध कर विभागाने केला आहे. दरम्यान आतापर्यंतच्या कारवाईत महापालिकेने 200 हून अधिक बेकायदा बॅनर हटवले आहेत. 


नाशिक महानगरपालिकेने (NMC) बेकायदेशीर जाहिरात फलकांच्या विरोधात केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून, गेल्या तीन दिवसांत राजकीय पक्ष आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांशी संबंधित 200 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर हटवले आहेत. बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरोधात विशेष मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. नाशिकरोड विभागातील दत्त मंदिर चौक, बिटको पॉइंट आणि जेलरोड परिसरात मनपा पथकांनी ही मोहीम राबवली. दरम्यान नाशिक महापालिकेने आता शहरात 146 ठिकाणे निश्चित केली असून जिथे शुल्क भरून काही दिवसांसाठी तात्पुरते होर्डिंग्ज लावता येतील. मात्र, त्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.


सध्या शहरात होर्डिंग्ज, बॅनर, शुभेच्छा फलक लावण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यामुळे नाशिक शहराच्या शहर सौंदर्यीकरणावर परिणाम होत होता. अखेर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नवीन धोरण जाहीर केले. त्यानुसार शहरात मनपा व खासगी जागेत होर्डिंग्ज लावण्याबाबतची ठिकाणे, तसेच त्याचे भाडेही जाहीर केले. शहरातील ठिकाणे निश्चित करण्यात आली त्यानुसार या ठिकाणांव्यतिरिक्त मोकळ्या जागेवर लावण्यात आलेले होर्डिंग बेकायदेशीर ठरवून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. यानुसार नाशिक महापालिकेने 200 हून अधिक बेकायदा बॅनर हटवले.


होर्डिंग्जवर क्यूआर कोड हवा...


नाशिक महापालिकेने शहरातील अधिकृत होर्डिंग्जच्या जागा निश्चित केल्या असून, त्याची यादीही महापालिकेच्या संकेतस्थळावर www.nmc.gov.in प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी होर्डिंग्ज लावायचे असेल तर संबंधित विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांत अधिकृत अर्ज दाखल करून संबंधित परवाना घ्यावा, तसेच होर्डिंग्जवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण या माहितीचा क्यूआर कोड बंधनकारक केला आहे.